मुंबई : आयसीसीनं लागू केलेल्या नव्या नियमांचा फटका धोनी आणि वॉर्नरला बसणार आहे. बॅटच्या आकारावर निर्बंध घालण्याचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे. २८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या सीरिजपासून हे नवे नियम लागू होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेंद्रसिंग धोनीच्या बॅटचं वजन १,२५० ते १,३०० ग्रॅम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी धोनीनं त्याच्या बॅटचं वजन कमी केलं आहे. धोनीच्या बॅटचा खालचा हिस्सा जास्त मोठा आहे आणि बॅटच्या खालच्या भागामध्ये लाकूडही जास्त प्रमाणात वापरलं आहे.


तर विराट कोहलीची बॅट १,१६० ग्रॅमची आहे. रोहित शर्माच्या बॅटचं वजन ११६० ते ११८० ग्रॅम एवढं आहे. रोहितच्या बॅटचे किनारे ४० एमएमपेक्षा कमी आहेत. अजिंक्य रहाणे आणि युवराज सिंगच्या बॅटचं वजनही कोहलीच्या बॅट एवढचं आहे. एबी डिव्हिलियर्स, स्टिव्ह स्मिथ आणि जो रूट हे खेळाडूही ४० मिमीपेक्षा कमी जाडीची बॅट वापरतात. या नियमांमुळे त्यांना बॅट बदलावी लागणार नाही.


धोनीच्या बॅटची जाडी ४५ मिमी आहे. तर वॉर्नर, गेल आणि पोलार्ड ५० मिमीची बॅट वापरतात. आयसीसीच्या नव्या नियमांमुळे या बॅट्समनना त्यांच्या बॅटमध्ये बदल करावे लागणार आहेत.


बॅट आणि बॉलमध्ये संतूलन ठेवण्यासाठी बॅटच्या आकारावर आयसीसीकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार बॅटच्या एजची जाडी ४० मिलीमिटरपेक्षा जास्त, तर खोली ६७ मिलीमिटरपेक्षा जास्त असू शकणार नाही. बॅटचा आकार पाहण्यासाठी अंपायर यंत्र घेऊन मैदानात उतरणार आहेत. तसंच बॅटचा दांडा हा संपूर्ण बॅटपेक्षा ५४ टक्क्याहून अधिक चालणार नाही.