मुंबई : वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी महेंद्रसिंग धोनीला भारतीय टीममध्ये संधी मिळाली नाही. यानंतर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहे. पण द इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार धोनीला विश्रांती नाही तर वगळण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. टी-२० क्रिकेटसाठी आता आम्ही दुसरे खेळाडू बघत असल्याचं निवड समितीनं धोनीला सांगितलंय. तसंच निवड समितीनं टीम व्यवस्थापनाच्या माध्यमातून हा निरोप धोनीपर्यंत पोहोचवला आहे. आणि आता नव्या खेळाडूंना संधी द्यायची वेळ आली आहे, असं सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी हा २०२० साली होणारा टी-२० वर्ल्ड कप खेळणार नाही. मग टी-२० साठी धोनीऐवजी दुसऱ्या खेळाडूंना संधी द्यायचा निर्णय निवड समितीनं घेतला असल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा निवड समितीच्या बैठकीला उपस्थित होते. या दोघांच्या परवानगीशिवाय निवड समितीचे सदस्य धोनीला वगळण्याचा निर्णय घेतील, असं वाटतं का, असंही बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.


वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी निवड समितीनं ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकला संधी दिली. धोनी या ६ टी-२० मॅच खेळणार नाही कारण आम्ही दुसऱ्या विकेट कीपरच्या शोधात आहोत. त्यामुळे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकला संधी देण्यात आल्याचं निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले.


यावर्षी धोनीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यावर्षी एकाही अर्धशतकाशिवाय धोनीची सरासरी २५.२० एवढी आहे. धोनीच्या या फॉर्ममुळे भारतीय टीमच्या मधल्या फळीतील चिंता वाढल्या आहेत. पण २०१९ साली होणारा ५० ओव्हरचा वर्ल्ड कप धोनी खेळेल, असं मानलं जातंय. वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये धोनीचा अनुभव आणि तणावातली परिस्थिती शांतपणे हाताळण्याची धोनीची सवय यामुळे धोनीला वर्ल्ड कपमध्ये संधी देण्यात येईल, असा अंदाज आहे.