धोनीवरच्या टीकेवर विराट कोहलीचं सडेतोड प्रत्युत्तर
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनीवर टीका होत आहे.
लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनीवर टीका होत आहे. दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८६ रननी पराभव झाला. या मॅचमध्ये धोनीनं ५९ बॉलमध्ये ३७ रनची खेळी केली. या खेळीमुळे धोनीला टीकेचा सामना करावा लागला. इंग्लंडनं भारतापुढे ३२३ रनचं लक्ष्य ठेवलं होतं. पण वरच्या फळीतले बॅट्समन लवकर आऊट झाल्यावर धोनीवर जबाबदारी होती पण त्याला जलद रन बनवता आल्या नाहीत. त्यामुळे भारताला ५० ओव्हरमध्ये २३६ रनच बनवता आले.
नासिर हुसेनचा धोनीवर प्रश्न
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेननं धोनीच्या या खेळीवर प्रश्न उपस्थित केले होते. नासिर हुसेनच्या या टीकेला कर्णधार विराट कोहलीनं सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. लोकं एवढ्या लवकर निष्कर्षापर्यंत पोहोचतात हे दुर्भाग्यपूर्ण आहे. जेव्हा धोनी चांगलं खेळतो तेव्हा तो सर्वोत्तम फिनिशर असतो पण जेव्हा गोष्टी हव्या तश्या होत नाहीत तेव्हा त्याच्यावर टीका होते. धोनीकडे अनुभव आहे पण प्रत्येकवेळी तुम्हाला हव्या तसंच होत नाही. आम्हाला धोनीवर आणि त्याच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे, असं कोहली म्हणालाय.
याआधीही झाली धोनीवर टीका
मागच्या वर्षीही धोनीच्या कामगिरीवर अशाच प्रकारे टीका करण्यात आली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२०नंतरही धोनीवर निशाणा साधण्यात आला होता.
लक्ष्मण-आगरकरचा सल्ला
न्यूझीलंडविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर लक्ष्मण आणि आगरकरनं धोनीला टी-२० क्रिकेटमधून निवृत्त व्हायचा सल्ला दिला होता. त्यावेळीही विराट कोहली आणि रवी शास्त्रीनं धोनीचा बचाव केला होता.
धोनीच्या वनडेमध्ये १० हजार रन
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये धोनीनं वनडे क्रिकेटमध्ये १० हजार रन पूर्ण केल्या. हे रेकॉर्ड करणारा धोनी चौथा भारतीय खेळाडू बनला. याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविडनं १० हजार पेक्षा जास्त रन बनवल्या. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन बनवणाऱ्या खेळाडूंमध्ये धोनी १२व्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेच्या कुमार संगकारानं १४,२३४ रन केल्या आहेत. संगकारा या यादीमध्ये दुसऱ्या आणि सचिन पहिल्या क्रमांकावर आहे.