वादळी अर्धशतक केल्यावर धोनीनं केली ही रेकॉर्ड
यंदाच्या आयपीएल मोसमामध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
पुणे : यंदाच्या आयपीएल मोसमामध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. पुण्यात झालेल्या मॅचमध्ये धोनीनं केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईनं दिल्लीविरुद्धची मॅच 13 रननी जिंकली. धोनीच्या अर्धशतकाबरोबरच वॉटसनच्या 79 रन आणि अंबाती रायडूच्या 41 रनमुळे चेन्नईनं 211 रनचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीनं 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 198 रन केल्या. या मॅचमध्ये धोनीनं 22 बॉलमध्ये नाबाद 51 रन केल्या. या खेळीमध्ये 5 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. या फोरबरोबरच धोनीनं काही रेकॉर्डही केली आहेत.
धोनीचं तिसरं अर्धशतक
यंदाच्या आयपीएलमधलं धोनीचं हे तिसरं अर्धशतक आहे. याआधी 2013 साली धोनीनं एका सिझनमध्ये सर्वाधिक 4 अर्धशतकं केली होती. धोनीचं हे आयपीएलमधलं दुसरं सर्वात जलद अर्धशतक आहे. याआधी 2012 साली धोनीनं मुंबईविरुद्ध 20 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. धोनीचं टी-20 क्रिकेटमधलं हे तिसरं सर्वात जलद अर्धशतक आहे. 2013 सालच्या चॅम्पियन्स लीगमध्ये हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीनं फक्त 16 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं.
सर्वाधिक रन करणारा कर्णधार
या अर्धशतकाबरोबरच धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणारा कर्णधार बनला आहे. धोनीनं गंभीरचं हे रेकॉर्ड मोडलं आहे. धोनीनं आयपीएलमध्ये 2536 रन केले आहेत. आयपीएलमध्ये गंभीरनं 3,518, विराट कोहलीनं 3,333 आणि रोहित शर्मानं 2198 रन केल्या आहेत.
धोनीनं मारल्या 20 सिक्स
या सिझनमध्ये धोनीनं आत्तापर्यंत 20 सिक्स लगावल्या आहेत. सिक्स मारण्याच्या यादीमध्ये धोनी आणि अंबाती रायडूच्या 20 सिक्स आहेत. या सिझनमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्यांच्या यादीमध्ये हे दोघं पाचव्या क्रमांकावर आहेत. यंदा ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि आंद्रे रसेल यांनी सर्वाधिक 23 सिक्स मारल्या आहेत. पण कमी मॅचमध्ये जास्त सिक्स मारल्यामुळे या यादीत ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे.
तीन मॅचमध्ये 5 पेक्षा जास्त सिक्स
या सिझनच्या तीन मॅचमध्ये धोनीनं 5 पेक्षा जास्त सिक्स मारले आहेत. पंजाब, बंगळुरू आणि दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीनं 5 पेक्षा जास्त सिक्स लगावले.