वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे-टी-२० साठी या खेळाडूंना संधी मिळणार!
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सीरिजसाठी भारतीय टीमची निवड आज होण्याची शक्यता आहे.
हैदराबाद : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-२० सीरिजसाठी भारतीय टीमची निवड आज होण्याची शक्यता आहे. पहिल्या तीन वनडेसाठी का सगळ्या ५ वनडेसाठी भारतीय टीमची निवड होईल का याबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकली नाही. वनडे सीरिजला २१ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये ५ वनडे आणि ३ टी-२० मॅचची सीरिज होईल.
धोनीला विश्रांती मिळणार?
महेंद्रसिंग धोनीच्या खराब फॉर्ममुळे निवड समिती त्याच्याऐवजी ऋषभ पंतला संधी देऊ शकते. धोनी विकेट कीपिंग करताना अजूनही चपळ असला तरी त्याच्या बॅटनं रन निघत नाहीयेत. याचीच चिंता निवड समितीला आहे. धोनी वर्ल्ड कपपर्यंत खेळेल हे सगळ्यांना माहिती आहे. पण ऋषभ पंतला संधी देण्यात काहीच नुकसान नाही. पंत सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर खेळेल. पंतकडे मॅच संपवण्याची क्षमता आहे, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
ऋषभ पंत शानदार फॉर्ममध्ये
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या टेस्टमध्ये पंतनं शतक केलं यानंतर राजकोटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्टमध्ये पंतनं ९२ रनची खेळी केली. यामुळे पंतनं वनडे सीरिजसाठी निवड समितीचे दरवाजे ठोठावले आहेत. दिनेश कार्तिकही गेल्या काही दिवसांपासून भारतीय वनडे आणि टी-२० टीममध्ये आहे. पण त्याच्या प्रदर्शनात सातत्याचा अभाव आहे. महत्त्वाच्या क्षणी मॅच संपवण्यात कार्तिकला अपयश आलं. यामुळे पंतचा विचार होऊ शकतो.
विराटवरच्या ओझ्याची चर्चा
एकसारखं क्रिकेट खेळल्यामुळे विराटवरच्या कामाच्या ओझ्याची चर्चाही या बैठकीत होऊ शकते. पण विराटला या सीरिजसाठी विश्रांती मिळण्याची शक्यता कमी आहे.
केदारला दुखापत, रायुडूची जागा निश्चित
मांसपेशीच्या दुखापतमीमुळे त्रस्त असल्यानं केदार जाधव बाहेर आहे. त्यामुळे मिडल ऑर्डरमध्ये एक जागा शिल्लक आहे. आशिया कपमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे अंबाती रायुडूची जागा निश्चित मानली जातेय.
बॉलिंगमध्येही बदल होणार?
टेस्ट सीरिजसाठी भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांचा पुनरागमन निश्चित मानलं जातंय. रवींद्र जडेजा आणि अक्सर पटेलचाही टीममध्ये समावेश होईल, अशी चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून चांगली कामगिरी न करणाऱ्या मनिष पांडेला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.