मुंबई : वर्ल्ड कप संपल्यानंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. ३ ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ३ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजसाठी धोनीची टीम इंडियामध्ये निवड होणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. पण मीडियामध्ये येत असलेल्या वृत्तानुसार धोनी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी हा आता टीम इंडियाची पहिली पसंती असणार नाही. धोनीऐवजी ऋषभ पंतला प्राधान्य दिलं जाईल. पण धोनी हा टीम इंडियाच्या १५ सदस्यीय टीमचा भाग असेल. टीम इंडियाच्या संक्रमणाच्या कालावधीमध्ये धोनी हा युवा खेळाडूंना मदत करेल.


वर्ल्ड कपमध्ये धोनीने ८ इनिंगमध्ये २७३ रन केले. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये धोनीने अर्धशतकही झळकावलं, पण त्याला भारताला विजय मिळवून देता आला नाही. या पराभवामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड कपमधलं आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आलं. या वर्ल्ड कपमध्ये धोनी संथ गतीने खेळल्याची टीकाही करण्यात आली.


वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी १९ जुलैला टीम इंडियाची निवड होणार आहे. या टीममध्ये धोनीला संधी दिली जाते का? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.