`चहल-कुलदीपनं धोनीचे पाय धरावेत`
पोर्ट एलिजाबेथमध्ये खेळवण्यात आलेल्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला ७३ रन्सनी हरवलं.
मुंबई : पोर्ट एलिजाबेथमध्ये खेळवण्यात आलेल्या पाचव्या वनडेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेला ७३ रन्सनी हरवलं. याचबरोबर ६ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारतानं ४-१नं विजयी आघाडी घेतली आहे.
भारताच्या या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले स्पिनर्स युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव. या दोघांच्या फिरकीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समननी लोटांगण घातलं. या दोघांनी ५ वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ३० विकेट घेतल्या. यातल्या चहलनं १४ तर कुलदीप यादवनं दक्षिण आफ्रिकेच्या १६ बॅट्समनना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
चहल आणि कुलदीपच्या या कामगिरीमध्ये विकेट कीपर धोनीचं योगदान मोठं आहे, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू अतुल वासननं दिली आहे. या दोघांनी घेतलेल्या विकेटपैकी अर्ध्या विकेटचं श्रेय धोनीला जातं असं वासन म्हणालाय.
कुलदीप आणि चहलच्या बॉलिंगवर धोनी शानदार विकेट कीपिंग करतो. या दोघांनी जाऊन धोनीचे पाय धरावेत, असं वक्तव्य अतुल वासननं केलंय.
धोनीवर होत आहे टीका
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ वनडेमध्ये धोनीनं फक्त ६९ रन्स बनवल्या आहेत. या कामगिरीमुळे धोनीवर टीकाही होत आहे. पण धोनीच्या विकेट मागच्या कामगिरीकडेही पाहिलं पाहिजे, असं अतुल वासनला वाटतंय.
भारतीय स्पिनर्सची सर्वश्रेष्ठ कामगिरी
कुलदीप आणि चहलनं घेतलेल्या ३० विकेट ही भारतीय स्पिनर्सची वनडे सीरिजमधली सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. याआधी २००५-०६ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय स्पिनर्सनी घरच्या मैदानात २७ विकेट घेतल्या होत्या.
कुलदीपनंही दिलं धोनीला श्रेय
कुलदीप यादवनंही त्याच्या या कामगिरीचं श्रेय धोनीला दिलं आहे. धोनीनं स्टम्पच्या मागे उभं राहून दिलेले सल्ले महत्त्वाचे ठरले, असं कुलदीप म्हणाला आहे.