मुंबई : जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी सेवा केल्यानंतर धोनीने आपण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. पण या सीरिजसाठी धोनीची निवड व्हायची शक्यता कमी आहे. पुढच्या वर्षी होणारा टी-२० वर्ल्ड कप बघता ऋषभ पंतलाच संधी दिली जाऊ शकते. ऑक्टोबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्ड कप होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टी-२० १५ सप्टेंबरला धर्मशाळामध्ये, दुसरी टी-२० १८ सप्टेंबरला मोहालीला आणि तिसरी टी-२० २२ सप्टेंबरला बंगळुरूमध्ये होणार आहे. ४ सप्टेंबरला या सीरिजसाठीच्या टीमची निवड व्हायची शक्यता आहे.


नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा ३-०ने विजय झाला होता. या सीरिजमध्ये खेळलेली टीमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


'पुढच्या टी-२० वर्ल्ड कपआधी भारत २२ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार आहे. भविष्याचा विचार करण्याबाबत निवड समितीची भूमिका स्पष्ट आहे,' असं बीसीसीआयमधल्या सूत्राने पीटीआयला सांगितलं आहे.


बीसीसीआय किंवा निवड समिती धोनीशी निवृत्तीबाबत बोलेल का नाही, याबाबत मात्र अजून काहीही स्पष्ट झालेलं नाही. 'निवृत्ती हा वैयक्तिक विषय आहे. निवड समिती किंवा दुसऱ्या कोणालाही याबाबत निर्णय घ्यायचा अधिकार नाही. पण टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम उभारण्याचा अधिकार निवड समितीला आहे. त्यामुळे ते ऋषभ पंतला जास्तीत जास्त संधी देऊ शकतात,' असं स्पष्टीकरण सूत्राने दिलं.


पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार संजू सॅमसन हा दुसऱ्या पसंतीचा आणि इशान किशन तिसऱ्या पसंतीचा विकेट पीकर आहे. निवड समितीचे काही सदस्य हे तिरुवनंतपुरमला भारत-एच्या सीरिजमध्ये संजू सॅमसनची कामगिरी पाहण्यासाठी जाणार आहेत. संजू सॅमसनची बॅटिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार आहे, पण विकेट कीपिंगमध्ये मात्र त्याच्यात अजून सुधारणा होत आहे.


वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी-२०मध्ये पंतने अर्धशतक केलं होतं. ईशान किशनही भारत-ए कडून खेळत आहे. ऑस्ट्रेलियातल्या मोठ्या मैदानांचाही निवड समितीला विचार करावा लागणार असल्याचं सूत्र म्हणाला.