Rishabh Pant Instagram Reel Video: भारताच्या दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशच्या संघाविरूद्धची कसोटी मालिका भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2-0 च्या फरकाने जिंकत पाहुण्यांना व्हाइट वॉश दिला. पहिली कसोटी आरामात जिंकल्यानंतर दुसऱ्या कसोटीमध्ये तर अडीच दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतरही भारताने कसोटीत विजय मिळवला. टी-20 स्टाइल फटकेबाजी करत भारताने ही कसोटी अवघ्या अडीच दिवसाच्या खेळाच्या जीवावर जिंकली. या कसोटी मालिकेमध्ये भारतासाठी सर्वात उजवी बाजू ठरली ती गंभीर जखमी झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांहून अधिक काळाने कसोटी क्रिकेटच्या मैदानात उतरलेला ऋषभ पंत!


पंतचं दमदार कमबॅक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतने पहिल्या कसोटीमध्ये भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. शतकी खेळी करत पंतने भारताचा विजय सुखकर केला. पहिल्या कसोटीमधील दोन्ही डावांमध्ये त्याने उत्तम खेळ केला. परिस्थितीनुरुप खेळताना त्याने संघाला सावरलं आणि डावाला आकार दिला. दुसऱ्या कसोटीमध्ये स्टम्प माईकमध्ये त्याने दिलेले सल्ले चर्चेत राहिले. भारताने दुसरी कसोटी शेवटच्या दिवशी म्हणजेच 1 ऑक्टोबरला जिंकली. 


नागाच्या पिल्याला तू...


भारताने कसोटी जिंकल्यानंतर ऋषभ पंतने चक्क मराठी गाण्यावर एक रिल बनवून पोस्ट केलं आहे. विशेष म्हणजे पंतने निवडलेलं गाणं ऐकून मराठी चाहत्यांनी या रिलचा संबंध थेट बांगलादेशच्या पराभवाशी जोडला आहे. पंतने 'कल्लूळाचं पाणी कशाला ढवळीलं नागाच्या पिल्याला तु का गं खवळीलं...' या गाण्यावर रिल बनवला असून या रिलमध्ये तो कसोटीसाठी सराव करताना दिसत आहे. पंतच्या या रिलवर हजारो कमेंट्स असून मराठी चाहत्यांनी तर कमेंट्सचा पाऊस पडलाय.


बांगलादेशला डिवचण्यासाठी मुद्दाम निवडलं हे गाणं?


अशातच अनेकांनी नागीण डान्स करुन विरोधी संघाला डिवचणाऱ्या बांगलादेशची खोड मोडण्यासाठी मुद्दाम पंतने नागाच्या पिलाला हे गाणं निवडल्याचं निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. 'त्याने बांगलादेशच्या संघाला डिवचण्यासाठीच नागाचं गाणं वापरलं आहे,' असं प्रवीण भुजबळ या चाहत्याने म्हटलं असून त्याच्या या प्रतिक्रियेला 1300 हून अधिक लाईक्स आहेत. अनेकांनी तर पंतने वापरलेलं हे गाणं पाहून आता त्याला ऋषभ पंत ऐवजी ऋषभ पाटील म्हटलं पाहिजे अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)


के. एल. राहुलचीही कमेंट


या व्हिडीओत पंतबरोबर भारताचा सलामीवीर के. एल. राहुलही दिसत आहे. त्याने सुद्धा या व्हिडीओवर कमेंट करत पंतला अष्टपैलू असं म्हटलं आहे. त्याच्या कमेंटलाही 25 हजारांहून अधिक लाईक्स आहेत. काहींनी तर पंतला भावा हे कोणत्या लाईनमध्ये आलास असा प्रश्न विचारला आहे. अनेकांनी पंतला प्लीज तुझ्या गाण्यांची प्ले लिस्ट शेअर कर असं हे गाणं ऐकून म्हटलं आहे.