सचिन-गावसकर-द्रविड नाही तर या भारतीयाची लॉर्ड्सवर आहेत ३ शतकं
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर आता दुसऱ्या टेस्टमध्ये पुनरागमन करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.
लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर आता दुसऱ्या टेस्टमध्ये पुनरागमन करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल. ९ ऑगस्टपासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानामध्ये दुसऱ्या टेस्टला सुरुवात होईल. मागच्यावेळी लॉर्ड्सवर झालेल्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला होता. या विजयाच्या आधी भारताच्या लॉर्ड्सवर तीन मॅच झाल्या होत्या. यातल्या २ वेळा भारताचा पराभव झाला तर १ मॅच ड्रॉ झाली. लॉर्ड्सच्या या ऐतिहासिक मैदानात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि गावसकर या दिग्गजांचं नाही तर दिलीप वेंगसरकर यांचं प्रदर्शन सर्वोत्तम राहिलं आहे. कर्नल या नावानं प्रसिद्ध असलेल्या वेंगसरकर यांनी लॉर्ड्सवर लागोपाठ ३ शतकं बनवली आहेत. कोणत्याही भारतीयाला हे रेकॉर्ड करता आलेलं नाही.
१९७६ ते १९९२ पर्यंत वेंगसरकर भारताकडून खेळले. वेंगसरकर यांनी ११६ टेस्ट आणि १२९ वनडे मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. टेस्ट क्रिकेटमध्ये वेंगसरकर यांनी ४२.१३ च्या सरासरीनं ६८६८ रन केल्या. यामध्ये १७ शतकं आणि ३५ अर्शशतकांचा समावेश होता.
लॉर्ड्सच्या मैदानात वेंगसरकर यांनी ४ टेस्ट मॅचमध्ये ७२.५७ च्या सरासरीनं ५०८ रन केले. यामध्ये ३ शतकं आणि एक अर्धशतक होतं. लॉर्ड्सवर त्यांचा सर्वाधिक स्कोअर १५७ रन होता. वेंगसरकर यांनी लॉर्ड्सवर १९७९ मध्ये ० आणि १०३, १९८२ मध्ये २ आणि १५७ आणि १९८६ मध्ये नाबाद १२६ आणि ३३ रनची खेळी केली होती.
लॉर्ड्सवर ९ भारतीयांची शतकं
लॉर्ड्सवर आत्तापर्यंत फक्त ९ भारतीयांनाच शतक झळकावता आलं आहे. यामध्ये विनू मंकड, गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, मोहम्मद अझहरुद्दीन, सौरव गांगुली, अजित आगरकर, राहुल द्रविड, अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे. लॉर्ड्सवर सर्वाधिक स्कोअर बनवणारे भारतीय विनू मंकड आहेत. विनू मंकड यांनी १९५२ साली लॉर्ड्सवर १८४ रनची खेळी केली होती.