IPL 2024: रॉयल चँलेजर्स बंगळुरु (royal challengers bengaluru) संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने आयपीएलच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षात झालेली सर्वात मोठी चूक तसंच फिरकी गोलंदाज कुलदीप यादवसह असणाऱ्या क्लिष्ट नात्यावर भाष्य केलं आहे. सध्याच्या हंगामात दिनेश कार्तिकने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं आहे. त्याने 4 सामन्यात 45 च्या सरासरीने 90 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 173 आहे. कार्तिकने 247 आयपीएल सामन्यात 26.02 ची सरासरी आणि 133 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 4606 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 20 अर्धशतकं ठोकली आहेत. 97 त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो 10 व्या स्थानी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिनेश कार्तिक दिल्ली कॅपिटल्स, पंजाब, मुंबई इंडियन्स, दिल्ली, बंगळुरु, गुजरात, कोलकाता या संघातून खेळला आहे. 2013 मध्ये मुंबई संघात असताना त्याने स्पर्धा जिंकली होती. नुकतंच त्याने आर अश्विनच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मुंबई इंडियन्सने 2013 मध्ये रिटेन न केल्याची खंत व्यक्त केली. मुंबई संघातच राहिलो असतो तर फलंदाज म्हणून आणखी चांगलं होण्याची संधी लाभली असती असं त्याचं म्हणणं आहे. तसंच आपलं राज्य असतानाही चेन्नई संघातून खेळू न शकल्याची खंतही त्याने मांडली आहे. 


"जर तुम्ही मला आयपीएल क्रिकेट करिअरमधील खंत कोणती असं विचारलं तर 2013 मध्ये रिटेन करण्यात आलं नाही ही आहे. आयुष्यात जर काही गोष्टींकडे परत जाता आलं तर असं वाटतं की तुम्ही तरुण खेळाडू असताना चांगल्या प्रशिक्षकाची गरज असते. त्यावेळी अभिषेक नायर यांची साथ लाभली असती तर मला मुंबईकडून खेळायला मिळालं असतं," असं कार्तिकने म्हटलं.


"मी खंत करत बसणाऱ्यांपैकी नाही. पण जर तुम्ही मला विचारलं तर आयपीएल क्रिकेट करिअरमध्ये दोन गोष्टींची फार खंत आहे. मुंबईने मला रिटेन केलं असता तर मी एक चांगला खेळाडू म्हणून विकसित झालो असतो. तसंच दुसरं म्हणजे मी चेन्नईचं प्रतिनिधित्व करु शकलो नाही. पण ते मी समजू शकतो. मी चेन्नईचा असल्याने पिवळ्या जर्सीत खेळायला आवडलं असतं. पण ते प्रत्येक लिलावात मला संघात घेण्याचा प्रयत्न करतात," असं कार्तिकने सांगितलं. 


दिनेश कार्तिकने 2018-20 दरम्यान कोलकाता संघाचं नेतृत्व केलं होतं. यादरम्याने त्याने फिरकी गोलंदाज कुलदीप यादवसह कठोर भाषेत संवाद साधला होता. कुलदीप यादवने 2019 च्या हंगामात 9 सामन्यांमध्ये फक्त 4 विकेट्स घेतले होते. यामुळे त्याला बेंचवर बसवण्यात आलं होतं. 


दिनेश कार्तिकने सांगितलं की, कुलदीप आता जितकी चांगली कामगिरी करत आहे तितकी तेव्हा करत नव्हता. यामुळे आपल्याला त्याला सत्यस्थिती सांगणं गरजेचं होतं. यावेळी त्याने कुलदीपने मिळवलेल्या यशावर आनंदही व्यक्त केला. सध्या दिल्ली संघात असणाऱ्या कुलदीपला आपण नेमकं तेव्हा काय सांगण्याचा प्रयत्न करत होतो हे समजून घ्यावं अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे. तसंच त्यात काही वैयक्तिक नव्हतं असंही स्पष्ट केलं.


"संघाचं नेतृत्व करणं ही वेगळी बाब आहे. यादरम्यान प्रत्येकाला हाताळणं आव्हानात्मक असतं. यादरम्यान तुम्हाला जे आहे ते सांगावं लागतं. नेतृत्व करताना तुम्ही काहीजणांशी मैत्री गमावू शकता," असं कार्तिकने सांगितलं. 


"कोलकाताचा कर्णधार असताना कुलदीप आता करतोय तितकी चांगली कामगिरी करत नव्हता. यादरम्यान आमच्यात काही कठोर संभाषणं झाली होती. त्यावेळी त्याने त्याचं कौतुक केलं असेल असं मला वाटत नाही. मला कठोर वागणं गरजेचं होतं," असं कार्तिक म्हणाला.


"कुलदीपसाठी तो कठीण काळ होता. मला वाटतं की त्या कठीण काळामुळे आज तो एक चांगला गोलंदाज बनला आहे. माझं दुर्दैव हे की मला त्याच्या आयुष्यातील त्या वाईट टप्प्याचा एक भाग व्हावं लागलं. मला आशा आहे की मी काय केले ते त्याला समजलं असेल. त्याने त्याचं कौतुक करावं आणि ते ठीक होतं असं मानावं अशी इच्छा नाही. तुम्हाला संघासाठी निर्णय घ्यायचे आहेत आणि त्यात वैयक्तिक काहीही नव्हते," असं कार्तिकने म्हटलं.