आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 38 वर्षीय दिनश कार्तिक सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) भारतीय संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पुढील महिन्यापासून टी-20 वर्ल्डकप खेळणार असून, ही स्पर्धा खेळण्यासाठी आपण जे काही शक्य आहे ते करु इच्छित असल्याचं म्हटलं आहे. 1 जूनपासून वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यावेळी दिनेश कार्तिक 39 वर्षांचा होईल. 2022 च्या टी-20 वर्ल्डकप संघातही दिनेश कार्तिकला स्थान देण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील टी-20 वर्ल्डकप सामना दिनेश कार्तिकचा अखेरचा असेल असं सांगण्यात आलं होतं. यानंतर दिनेश कार्तिक समालोचनाकडे वळला होता. पण या आयपीएल हंगामात त्याने आपल्या फलंदाजीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. दिनश कार्तिक तुफान फटकेबाजी करत असून त्याला स्ट्राइक रेट 205 पेक्षा जास्त आहे. बंगळुरु संघातील तो सर्वाधिक धावसंख्या करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसनंतर 226 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 


"वयाच्या या टप्प्यावर भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी महान भावना असेल. भारतीय संघाकडून खेळण्यासाठी मी फार उत्सुक आहे. माझ्यासाठी टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणं यापेक्षा मोठी गोष्ट नाही," अशी भावना दिनेश कार्तिकने व्यक्त केली आहे. 


दिनेश कार्तिक स्पर्धेत आल्याने आता भारतीय निवड समितीसमोर विकेटकिपरसाठी आणखी एक पर्याय निर्माण झाला आहे. निवड समिती दोन विकेटकिपरना संघात स्थान देण्याची शक्यता आहे. 


अपघातानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणारा ऋषभ पंत सध्या चांगली कामगिरी करत असून, दिल्लीचं नेतृत्व करताना सकारात्मक दिसत आहे . तसंच संजू सॅमसन, ईशान किशन आणि के एल राहुल हेदेखील स्पर्धेत आहेत. दिनेश कार्तिकने जो काही निर्णय घेतला जाईल त्याचा आपण आदर करु असं म्हटलं आहे. "राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि अजित आगरकर जो काही निर्णय घेतील त्याचा मी मान राखेन," असं दिनेश कार्तिकने सांगितलं.


पुढे त्याने म्हटलं आहे की, "हे तिघेही अत्यंत स्थिर, प्रामाणिक आहेत ज्यांच्यावर वर्ल्डकपसाठी सर्वोत्तम संघ निवडण्याची जबाबदारी आहे. मी पूर्णपणे त्यांच्यासोबत आहे. त्यांनी घेतलेला कोणताही निर्णय मान्य असेल. पण मी सांगू शकतो की, मी 100 टक्के तयार आहे. वर्ल्डकप संघात स्थान मिळवण्यासाठी जे काही लागेल ते मी करेन".


दिनेश कार्तिकने यावेळी आंद्रे रसेल किंवा किरॉन पोलार्डप्रमाणे मोठे फटके लगावण्यापेक्षा अचूकतेवर लक्ष केंद्रित करून, एक खेळाडू म्हणून आपली ताकद समजून घेण्याच्या महत्त्वावर जोर दिला. तो म्हणाला की, "फटके लगावताना मी गोलंदाजाचा पॅटर्न समून घेतो. सरावाच्या वेळी स्थितीचा विचार करुन त्याप्रमाणे फलंदाजी करतो". 


"सध्याच्या घडीला खेळाडू म्हणून तुम्हाला तुमच्या जमेची बाजू माहिती असायला हव्यात. मी काही रसेल किंवा पोलार्ड नाही जे मोठे फटके लगावत षटकार ठोकतील," असं दिनेश कार्तिक म्हणाला आहे.


"आपण गॅपमधून कसं खेळू शकतो, कोणत्या प्रकारचे चेंडू चौकार मारू शकतो हे मी समजून घ्यायला हवं.मला जाणवलं की एक विशिष्ट पॅटर्न आहे ज्यामध्ये गोलंदाज मला गोलंदाजी करत आहेत, त्यामुळे मी ते समजून खेळणं आवश्यक आहे. सराव करताना मी याची काळजी घेतो," असं दिनेश कार्तिक म्हणाला.