मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्ट मॅचला भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा मुकणार आहे. आयपीएलदरम्यान सहाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. सहाच्या दुखापतीवर सध्या बीसीसीआयचे डॉक्टर उपचार करत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी सहाला विश्रांती मिळावी आणि त्याची दुखापत पूर्ण बरी व्हावी म्हणून त्याला अफगाणिस्तानविरुद्ध खेळवण्यात येणार नाही. ऋद्धीमान सहाऐवजी दिनेश कार्तिकला टीममध्ये संधी देण्यात आली आहे. १४ जूनपासून बंगळुरूमध्ये या एकमेव टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहा आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळला. कोलकात्याविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये सहाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला चेन्नईविरुद्धची फायनलही खेळता आली नाही. याआधी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय टेस्ट टीममध्येही ऋद्धीमान सहाची निवड करण्यात आली होती. पण सेंच्युरिअनमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचआधी सहाच्या मांड्यांच्या स्नायूंना दुखापत झाली होती. त्यामुळे सहाऐवजी पार्थिव पटेलला या मॅचमध्ये संधी देण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये पटेलला चकमदार कामगिरी करता आली नव्हती.


दिनेश कार्तिक फॉर्ममध्ये


अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये दिनेश कार्तिकला संधी देण्यात आल्यामुळे ८ वर्षानंतर त्याचं भारतीय टेस्ट टीममध्ये पुनरागमन झालं आहे. दिनेश कार्तिक २०१० साली बांगलादेशविरुद्ध टेस्ट मॅच खेळला होता. २००४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध कार्तिकनं टेस्ट क्रिकेटमध्ये आगमन केलं होतं. कार्तिकनं २३ टेस्ट मॅचमध्ये १,००० रन केल्या आहेत. दिनेश कार्तिक सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. निडास ट्रॉफीच्या फायनलमधली वादळी खेळी आणि आयपीएलमध्ये कार्तिकनं शानदार प्रदर्शन केलं आहे.