World Cup 2023 Indian Team: भारत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामधून आपल्या वर्ल्डकप मोहिमेला सुरुवात करणार आहे. आज चेन्नईच्या मैदानावर हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरतील. भारताने यापूर्वी 2011 मध्ये जेतेपद पटकावलं होतं. सध्याचा वर्ल्डकप हा मोहम्मद शामी, आर. अश्वीन, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा शेवटचा वर्ल्डकप मानला जात आहे. पुढील वर्ल्डकप आधी हे खेळाडू निवृत्त होतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 2011 मध्ये भारताने सचिन तेंडुलकरसाठी वर्ल्डकप जिंकला असं म्हटलं जातं. सध्या अशीच चर्चा विराट कोहलीसंदर्भात सुरु आहे. याचबद्दल भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगला प्रश्न विचारण्यात आला असता त्याने अगदीच अनपेक्षित आणि धक्कादायक उत्तर दिलं. 


नेमकं काय विचारण्यात आलेलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरभजन सिंगला 'इंडिया टुडे'च्या मुलाखतीमध्ये सध्याची टीम इंडिया आणि 2011 च्या टीमबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळेस हरभजन सिंगने सध्याच्या संघात फूट असल्याचे संकेत देणारं विधान केलं. सध्याचा संघ हा 2011 च्या संघानुसार एकसंध दिसत नाही असं विधान हरभजनने केलं. "दोन्ही संघांमध्ये मोठा फरक दिसत आहे. तो संघ (2011 ला जेतेपद पटकावणारा संघ) फार एकसंध होता. त्यांना सचिन तेंडुलकरसाठी वर्ल्डकप जिंकायचा होता. इतरांकडून त्याला फार सन्मान मिळायचा. सध्याच्या संघाबद्दल मला असा विश्वास वाटत नाही. नेमका कोणाला विराट कोहलीसाठी हा वर्ल्डकप जिंकायचा आहे हे मला कळत नाही. त्यांना भारतासाठी वर्ल्डकप जिंकायचा आहे हे मात्र नक्की. यात फार मोठा फरक आहे," असं हरभजन सिंग म्हणाला. विराटसाठी वर्ल्डकप जिंकूया म्हटल्यावर किती खेळाडू एकत्र येतील याबद्दल शंका वाटते, असंही हरभजन सिंग म्हणाला.


सचिन, धोनीचाही उल्लेख


हरभजन सिंगने सचिन तेंडुलकरबद्दल सर्वांना सन्मान वाटत असल्याने त्यांना त्याच्यासाठी वर्ल्डकप जिंकायचा होता असं म्हटलं. विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंकायचाय असं म्हटलं तर किती खेळाडू एकत्र येतील मला सांगता येणार नाही, असंही हरभजन सिंग म्हणाला. "2011 च्या वर्ल्डकपदरम्यान ड्रेसिंग रुममध्ये सचिनसाठी दाखवण्यात आलेला मानसन्मान फार उच्च दर्जाचा होता. एम. एस. धोनीबद्दलही सर्व खेळाडूंना फार आदर वाटायचा. मात्र त्यानंतर असं कोणत्याही खेळाडूबरोबर घडलंय असं दिसलेलं नाही," असं हरभजन सिंगने म्हटलं.


विराटलाही हा वर्ल्डकप...


"त्यांना सर्वांना (भारतीय खेळाडूंना) भारतासाठी वर्ल्डकप जिंकायचा आहे. मात्र ते कोणत्याही खेळाडूसाठी ही स्पर्धा खेळत नाहीत. विराटला स्वत:ला देशासाठी कप जिंकावा असं वाटत असेल. तो स्वत:साठी हे यश बोनस म्हणूनच पकडेल, असं मला वाटतं," असं हरभजन म्हणाला.


आमचा प्रयत्न कायमच...


"हे सारं देशासाठी आहे. तुम्ही देशाच्या राष्ट्रध्वजाच्या अभिमानासाठी खेळता. मी केवळ भारतासाठी खेळलो कोण्या एका व्यक्तीसाठी नाही. माझा कर्णधार सौरभ गांगुली असो, राहुल द्रविड असो किंवा धोनी असो मला याचा फरक पडला नाही. मी भारतासाठी खेळत होतो हे महत्त्वाचं होतं. आमचा प्रयत्न कायमच भारत जिंकावा हाच असायचा विराट जिंकावा किंवा राहुल द्रविड जिंकावा यासाठी कोणी खेळत नसे," असं हरभजनने आपली भूमिका मांडताना म्हटलं.