आशिया कप: कितीही पाऊस पडला तरी थांबणार नाही मॅच, हे आहे `खास` कारण
दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिटे स्टेडियममध्ये आशिया कपच्या मॅच खेळवण्यात येत आहेत.
दुबई : दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिटे स्टेडियममध्ये आशिया कपच्या मॅच खेळवण्यात येत आहेत. भारत आणि पाकिस्तानचा मुकाबलाही याच स्टेडियममध्ये आहे. कोणत्याही क्रिकेट मॅचदरम्यान पाऊस आला तर क्रिकेट रसिकांची निराशा होते. पण या स्टेडियममध्ये पाऊस आला तरी मॅच थांबत नाही. ही या स्टेडियमची खासीयत आहे. 2009 साली बांधण्यात आलेल्या या स्टेडियमसाठी खास डिझाईन करण्यात आलं ज्यामुळे पाऊस पडला तरी मॅचमध्ये व्यत्यय येणार नाही.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या छतांवर दिवे लावण्यात आले आहेत. हे या स्टेडियमचं वेगळेपण आहे. इतर स्टेडियममध्ये खांबांवर दिवे लावण्यात येतात. पावसाला सुरुवात झाल्यानंतर स्टेडियमचं छत आपोआप बंद होतं. त्यामुळे पाऊस आला तरी मॅच सुरू ठेवण्यात येते.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमला बहुतेक लोकं दुबई स्पोर्ट्स सिटी क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखतात. अनेक खेळांसाठी हे स्टेडियम असलं तरी त्याचा मुख्य वापर क्रिकेट खेळण्यासाठी होतो. युएईतल्या शारजाह आणि शेख जायद क्रिकेट स्टेडियमनंतर या तिसऱ्या स्टेडियमला तयार करण्यात आलं. या स्टेडियममध्ये 25 हजार प्रेक्षकांची बसण्याची क्षमता आहे. या क्षमतेला 55 हजार करता येऊ शकतं. म्हणजेच आणखी 30 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची सोय करता येऊ शकते.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम बनवण्यासाठी 30 अरब रुपये खर्च करण्यात आला. या स्टेडियममध्ये अनेक लक्झरी सुविधा उपलब्ध आहेत. या स्टेडियमची मालकी दुबई प्रॉपर्टीजकडे आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम 52 एकर जमिनीत पसरलं आहे.
दुबईच्या या स्टेडियममध्ये फाईव्ह स्टार हॉटेल आहे. फाईव्ह स्टार हॉटेल असलेलं दुबई हे पहिलंच स्टेडियम आहे. याचबरोबरच या स्टेडियममध्ये रिसॉर्टही आहे. इनडोअर क्रिकेट हॉल आणि ओपन मार्केटही आहे. याचबरोबर अत्याधुनिक जिम, 6 स्विमिंग पूल, 4 हजार गाड्यांच्या पार्किंगची सोय अशा सुविधाही आहेत.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 350 दिवे आहेत. या दिव्यांना 'रिंग्ज ऑफ फायर' म्हणूनही संबोधलं जातं. खांबांवरच्या दिव्यांऐवजी स्टेडियमच्या छतावर हे दिवे लावण्यात आले आहेत. हे दिवे लागले की ते रिंग सारखे दिसतात म्हणून त्याला रिंग्ज ऑफ फायर म्हंटलं जातं.
या स्टेडियममध्ये कोणत्याही प्रकारची सावली दिसत नाही. छतांवर लावण्यात आलेल्या दिव्यांमुळे खेळाडूंनाही त्रास होत नाही. पाऊस पडला तरी या स्टेडियममध्ये क्रिकेट मॅच सुरूच राहते. कारण पावसाला सुरुवात झाली तर आपोआप छप्पर बंद होतं.