समलैंगिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना दुती चंदचं `गोल्डन` प्रत्यूत्तर
दूती चंद `युनिवहर्सियाड`मध्ये या विभागात `गोल्ड` जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलीय
नवी दिल्ली : नॅशनल रेकॉर्ड होल्डर असलेल्या धावपटू दुती चंद ही नुकतीच समलैंगिक नात्यात असल्याच्या कबुलीनंतर चर्चेत आली होती. या खुलाशानंतर तिला अनेकांकडून टीकेचा सामनाही करावा लागला. परंतु, याच टीकेला दुतीनं आपल्या 'गोल्डन' कामगिरीतून प्रत्त्यूत्तर दिलंय. इटलीमध्ये सुरू असलेल्या 'युनिव्हर्सिटी गेम्स'मध्ये दुतीनं 'ट्रॅक ऍन्ड फिल्डस'मध्ये गोल्ड मेडल पटकावलंय. यानंतर 'मला जेवढं खाली खेचण्याचा प्रयत्न कराल तितक्याच मजबुतीनं उठून पुन्हा उभी राहीनं' असं दुतीनं ट्विटरवर म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, दूती चंद 'युनिवहर्सियाड'मध्ये या विभागात 'गोल्ड' जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलीय. दुतीनं १०० मीटरच्या स्पर्धेत ११.३२ सेकंदांमध्ये ही शर्यत पूर्ण केली.
ओडिशाची रहिवासी असलेली दुती 'वर्ल्ड ऍथलेटिक्स इव्हेंट'मध्ये गोल्ड जिंकणारी दुसरी भारतीय महिला ऍथलिट बनलीय. याअगोदर हिमा दास हिनं गेल्या वर्षी 'वर्ल्ड ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियन'मध्ये ४०० मीटरमध्ये गोल्ड पटकावलं होतं.
दुती चंदच्या या गोल्डन कामगिरीबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही तिचं कौतुक केलंय. त्यांचे आभार मानताना दुतीनं आता आपलं लक्ष्य ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेजल पटकावण्याचं असेल असं म्हटलंय.
तसंच, मी लहानपणापासून ऑलिम्पियाड खेळ पाहत आलोय, आत्ता कुठे एखाद्या भारतीय महिलेनं गोल्ड जिंकण्याची कामगिरी केलीय, अशा शब्दांत क्रीडा मंत्री किरन रिजिजू यांनी दुतीचं अभिनंदन केलंय.
२०१८ च्या आशियाई खेळांत दुतीनं भारताला दोन सिल्वर मेडल जिंकून दिले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी दुतीनं आपल्या ओडिशाच्या गोपालपूरची रहिवासी असलेल्या एका तरुणीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं सांगत 'समलैंगिक' असल्याचं कबूल केलं होतं.
यासोबतच आपल्या बहिणीवर ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप करत आपल्याला मारहाण केल्याचंही दुतीनं म्हटलं होतं. '२५ लाख दिले नाही तर समलैंगिक असल्याचं जगासमोर आणू' अशी धमकी तिच्या बहिणीनं तिला दिली होती.
दुती ही पहिली भारतीय खेळाडू आहे जिनं आपण समलैंगिक असल्याची कबुली मोठ्या हिंमतीनं दिलीय.