परिवाराला विमानतळावर रोखल्याने भडकला शिखर धवन, एअरलाईन्सने मागितली माफी
टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन हा दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाला. यावेळी त्याच्यासोबत बायको आणि मुलंही होती. मात्र...
नवी दिल्ली : टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन हा दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाला. यावेळी त्याच्यासोबत बायको आणि मुलंही होती. मात्र, दुबई विमानतळावर शिखर धवनला त्यांच्यासोबत प्रवास करण्यात मज्जाव करण्यात आला. यानंतर शिखऱ धवनने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता एअरलाईन्स कंपनीनेही या प्रकरणी माफी मागितली आहे.
शिखर धवनच्या परिवाराकडे जन्म प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्र उपलब्ध नसल्याने त्यांना दुबई विमानतळावर रोखण्यात आले. त्यामुळे शिखर धवनला आपल्या परिवाराला सोडून दक्षिण अफ्रिकेला जावं लागलं.
या घटनेनंतर शिखर धवनने आपल्या ट्विटरवर लिहिलं की, "मी माझ्या पत्नी आणि मुलांना घेऊन केपटाऊनला जात होतो. मात्र, जन्म प्रमाणपत्र आणि इतर काही कागदपत्र नसल्याने त्यांना दुबईतच थांबावं लागलं. एमिरेट्स एअरलाईन्सकडून खूपच अनप्रोफेशनल व्यवहार मिळाला."
शिखर धवने पुढच्या ट्विटमध्ये म्हटलं की, "आम्ही आता दुबई विमानतळावर आहोत आणि कागदपत्रांची वाट पाहत आहोत. मुंबई विमानतळावरुन फ्लाईटमध्ये बसलो त्यावेळी एमिरेट्सने आम्हाला यासंदर्भात का विचारलं नाही?"
या सर्वप्रकरणानंतर आता एमिरेट्स एअरलाईन्सने माफी मागितली आहे. कंपनीने शिखर धवनला मिळालेल्या असुविधेसाठी माफी मागितली मात्र, त्यासोबतच धवनने केलेला आरोप फेटाळला आहे ज्यामध्ये धवनने एअरलाईन्सचा व्यवहार हा अनप्रोफेशनल असल्याचं म्हटलं होतं. तर, कंपनीने आपलं स्पष्टीकरण देताना म्हटलं की, आम्ही केवळ दक्षिण आफ्रिकेमध्ये असलेल्या कायद्यांचं पालन करत होतो.
एमिरेट्सच्या प्रवक्त्याने म्हटलं की, आम्हाला माहिती आहे की शिखर धवनच्या परिवाराला ठरलेल्या कार्यक्रमानुसार प्रवास करता आलं नाही. या असुविधेबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. एक जून २०१५ पासून दक्षिण आफ्रिकेच्या नियमांनुसार कुठलाही १८ वर्षांपेक्षा लहान व्यक्ती दक्षिण आफ्रिकेला जात असेल तर त्याला आपल्या आई-वडीलांचे संबंधित कागदपत्र दाखवणं आवश्यक आहे. सर्वच एअरलाईन्सला प्रत्येक देशातील नियमांचं पालन करावं लागतं आणि प्रवाशांची जबाबदारी आहे की, त्यांनी प्रवासापूर्वी संबंधित कागदपत्र आपल्यासोबत ठेवावी.