मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर टीका होतेय. या प्रकारानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला पदावरून डच्चू देण्यात आला आहे. क्रिकेटच्या इतिहासातला हा काळा दिवस असल्याचं मत अनेक दिग्गजांनी व्यक्त केलं आहे. पण क्रिकेटच्या इतिहासातला सगळ्यात काळा दिवस होता १९३२-३३मध्ये.


जंटलमन्स गेमच्या चिंध्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९३२-३३मध्ये इंग्लंडची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्याला जाणार होती. वारंवार ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यामुळे इंग्लंडचं मनोबल तुटलं होतं. डॉन ब्रॅडमन यांची बॅट कशी रोखायची हे आव्हान इंग्लंडच्या टीमपुढे होतं. हे आव्हान पेलण्यासाठी इंग्लंडनं चिटींगचा मार्ग अवलंबला. या सीरिजला बॉडीलाईन सीरिज म्हणूनही ओळखलं जातं.


इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना केलं जखमी


या सीरिजमध्ये डगलस हरबर्ट जार्डिन इंग्लंडचा कॅप्टन होता. या सीरिजसाठी जार्डिननं फास्ट बॉलर हेराल्ड लारवूडला वेगळी योजना आखायला सांगितली. इंग्लंडच्या टीममध्ये लारवूडसोबत विल वोसे, गबी अॅलन आणि बोबस हे फास्ट बॉलर होते. जार्डिननं लारवूड आणि वोसे यांना ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनची डोकी जखमी करायला सांगितलं. क्रिकेटच्या खेळामध्ये अशाप्रकारची अनैतिकता पहिल्यांदा पाहायला मिळाली होती.


अशी लावली होती फिल्डिंग


या बॉडी लाईन सीरिजमध्ये इंग्लंडनं लेग साईडला ७ फिल्डर ठेवले होते. दोन लेग स्लिप, एक लेग गली, फॉरवर्ड शॉर्ट लेग, स्क्वेअर लेग आणि लाँग लेग या ठिकाणी इंग्लंडनं खेळाडू ठेवले होते. लारवूड आणि वोसे बाऊन्सर टाकायचे तेव्हा ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन डोकं वाचवण्याचा प्रयत्न करायचे. या नादामध्ये खेळाडू कॅच आऊट व्हायचे.


लारवूडनं कहर केला


पहिल्या टेस्टमध्ये जार्डिननं लेग साईडला फिल्डिंग लावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि दर्शक हैराण झाले. हीच बॉडी लाईन सीरिजची सुरुवात होती. पहिल्या टेस्टमध्ये ब्रॅडमन खेळले नाहीत पण दुसऱ्या टेस्टमध्ये त्यांनी शून्य आणि १३९ रन्स केल्या. दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. खेळपट्टी धिमी असल्यामुळे ही मॅच ऑस्ट्रेलियाला जिंकता आली.


प्रेक्षक भडकले, पोलीस आले


तिसऱ्या टेस्टमध्ये लारवूडच्या बॉलिंगवर ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन गंभीर जखमी झाले. या खेळाडूंना स्ट्रेचरवरून घेऊन जावं लागलं. यानंतरही इंग्लंडचा कॅप्टन जार्डिनला काहीही फरक पडला नाही. अखेर प्रेक्षक भडकले आणि त्यांनी गोंधळ घालयाला सुरुवात केली. अखेर हा सगळा गोंधळ नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं.


इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या संबंधांवर परिणाम


या बॉडीलाईन सीरिजमुळे इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या संबंधांवरही परिणाम झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानं एमसीसीला तार पाठवून इंग्लंड खेळ भावना विसरून खेळत असल्याचं कळवलं. या वादामध्ये दोन्ही देशांचे नेते, मंत्री आणि पंतप्रधानांनीही उडी घेतली. ऑस्ट्रेलियानं सीरिज रद्द करण्याची तयारीही केली होती. तर प्रेक्षकांनी इंग्लंडचा युनियन जॅकही जाळला. भडकलेल्या प्रेक्षकांनी मैदानात येऊन इंग्लंडच्या खेळाडूंवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला.


ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी घातले कार्कयुक्त कपडे


तिसऱ्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर चौथ्या टेस्टमध्ये शरीराच्या बचावासाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू कार्कयुक्त कपडे घालून मैदानात उतरले. तरीदेखील चौथ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. जार्डिनच्या नेतृत्वात इंग्लंडनं ही सीरिज जिंकली असली तरी क्रिकेटच्या इतिहासाला काळिमा फासणारी सीरिज म्हणूनच याची कायम ओळख राहिली आहे. अशाप्रकारची बॉलिंग रोखण्यासाठी मग क्रिकेटच्या नियामांमध्ये बदल करण्यात आले.