मुंबई : इंग्लंड आणि ऑस्ट्रोलिया या दोन्ही संघांदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या अॅशेस क्रिकेट मालिकेत शनिवारी काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. ज्यावेळी शतकाच्या नजीक पोहोचणाऱ्या स्टीव्ह स्मिथ या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा मैदानात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाचा मारा सहन करावा लागला. अॅशेस क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात हे चित्र पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोफ्रा आर्चर या खेळाडून चेंडू इतक्या वेगाने फेकला की, स्टीव्ह स्मिथ खेळपट्टीवरच पडला. ज्यानंतर मैदानातच त्याच्यावर प्रथमोपचारही करण्यात आले. स्मिथवर यापूर्वीही आर्चरने अशाच गोलंदाजीचा मारा केला होता. पण, यावेळी मात्र त्याचा वेगवान चेंडू आणि स्मिथप्रती असणारं एकंदर वक्तव्य नेटकऱ्यांना मात्र फारसं रुचलं नाही. 


स्मिथ पडल्यानंतर आर्चरच्या चेहऱ्यावरील हास्यमुद्रा आणि त्याचा वावर पाहता खेळाची ही बाजू अत्यंत निराशाजनक असल्याचीच प्रतिक्रिया अनेक क्रीडारसिकांनी दिली. जवळपास १४२ किमी प्रतितास वेगाने येणारा चेंडू मानेवर आदळल्यानंतर स्मित मैदानावरच कोसळला. ज्यानंतर त्याच्या मदतीसाठी प्रतिस्पर्धी संघाच्या वैद्यकीय चमूनेही धाव घेतली. 





या प्रसंगानंतर स्मिथला मैदानातून काढता पाय घ्यावा लागला. त्यावेळी क्रीडा रसिकांनीही स्मिथचं कौतुक करत त्याच्या खेळाची दाद दिली. पुढे स्मिथ, पुन्हा मैदानात उतरला आणि दोन चौकार लगावत शतकाच्या दिशेने आगेकूच केली. पण, अखेर ९२ धावांवर त्याला बाद व्हावं लागलं.