पंतप्रधानांचा स्वॅग पाहून केविन पीटरसन भारावला; जंगल सफारीचे केले तोंडभरुन कौतुक
PM Modi Jungle Safari : बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी वेगळ्याच शैलीमध्ये दिसले. काळी टोपी, स्टायलिश चष्मा, प्रिंटेड टी-शर्ट आणि खाकी रंगाचे हाफ जॅकेट घालून पंतप्रधान मोदी व्याघ्र प्रकल्पात पोहोचले होते.
PM Modi Jungle Safari : म्हैसूरच्या प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) रविवारी कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात (Bandipur Tiger Reserve) सफारीला गेले होते. कर्नाटकातील म्हैसूर-उटी महामार्गावरील उंच पश्चिम घाटाच्या नयनरम्य परिसरामध्ये स्थित, बांदीपूर व्याघ्र प्रकल्प हा निलगिरी बायोस्फीअर रिझर्व्हचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हैसूरच्या प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इथे भेट दिली. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याचे इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने (Former England captain Kevin Pietersen) कौतुक केले आहे.
माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने ट्विट करत पंतप्रधानांचे कौतुक केले आहे. यासोबत पीटरसनने पंतप्रधान मोदींचा एक फोटोही पोस्ट केला आहे. "आयकॉनिक! आदर्श प्रेरणादायी असा एक जागतिक नेता जो वन्य प्राण्यांवर प्रेम करतो, नैसर्गिक अधिवासात त्यांच्यासोबत वेळ घालवताना खूप उत्साही असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिवशी, त्यांनी भारतातील जंगलात चित्ते आणून सोडले होते," अशा शब्दात केविन पीटरसनने पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.
महिन्याभरापूर्वी घेतली पंतप्रधानांची भेट
केविन पीटरसन भारत दौऱ्यावर असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दोघांच्या या भेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केविन पीटरसनचे कौतुक करण्यात आले होते. यावेळी त केविन पीटरसनने पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि त्यांना वैयक्तिकरित्या भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ही भेट झाली होती. यापूर्वी केविन पीटरसनने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती.
दरम्यान, बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट देताना पंतप्रधान मोदी वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळाले. दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदींनी काळी टोपी, स्टायलिश चष्मा, प्रिंटेड टी-शर्ट आणि खाकी रंगाचे हाफ जॅकेट घातले होते. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा दौरा आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनी कॅमेऱ्यातून अनेक फोटो काढले. यावेळी त्यांनी स्वत:च्या हाताने हत्तीला ऊस देखील खाऊ घातला. यासोबत पंतप्रधान मोदींनी मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू हत्तींच्या छावणीलाही भेट दिली.