Corona : कोरोना व्हायरसमुळे बोर्ड तोट्यात, या क्रिकेटपटूंच्या पगारात कपात
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे.
लंडन : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगातले बहुतेक देश लॉकडाऊन करण्यात आले आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम क्रीडा स्पर्धांवरही झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. खेळाडूंनाही याच्या आर्थिक परिणामांना सामोरं जाव लागत आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे पुरुष आणि महिला खेळाडूंच्या पुढच्या ३ महिन्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंना याचा फटका बसणार आहे. बोर्डाने खेळाडूंच्या पगारात २० टक्के कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव खेळाडूंनी मान्य केल्याचं खेळाडूंच्या संघटनेने सांगितलं आहे. पुरुष टीमचे खेळाडू ५ लाख पाऊंड कोरोनाचा सामना करण्यासाठी दान करणार आहेत.
पुरुष टीमसोबत महिला टीमच्यादेखील एप्रिल, मे आणि जून महिन्याचा पगारात कपात होणार आहे. 'सध्याची परिस्थिती पाहता हे योग्य पाऊल आहे, असं सगळ्या खेळाडूंना वाटत आहे. हा काळ खेळाला कसा प्रभावित करत आहे, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही आमच्यापरीने मदत करु शकतो,' असं महिला टीमची कर्णधार हीथर नाईट म्हणाली.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आधीच आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसमुळे इतर देशांप्रमाणेच इंग्लंडलाही क्रिकेट खेळता येत नाही, याचा आर्थिक फटका बोर्डाला बसत आहे. हे नुकसान कमी करण्यासाठी बोर्डाकडे खेळाडू आणि कर्मचाऱ्यांचा पगार कमी करण्यावाचून दुसरा कोणताच मार्ग नव्हता.