लंडन : भारताविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये इंग्लंड मजबूत स्थितीत पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर ११४-२ एवढा झाला होता. पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या ४० रनच्या आघाडीमुळे दुसऱ्या इनिंगची इंग्लंडची आघाडी १५४ रन झाली आहे. दिवसाच्या शेवटी आपली शेवटची टेस्ट खेळणारा एलिस्टर कूक ४६ रनवर नाबाद तर जो रूट २९ रनवर नाबाद खेळत आहेत. भारताकडून मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी एक विकेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याआधी तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारीच्या संघर्षानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये भारताचा ऑल आऊट झाला. भारताची इनिंग २९२ रनवर संपली. रवींद्र जडेजा ८६ रनवर नाबाद राहिला. तर आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या हनुमा विहारीनं ५६ रनची महत्त्वाची खेळी केली. जडेजा आणि विहारीच्या या खेळीनंतरही इंग्लंडला ४० रनची आघाडी मिळाली.


तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतानं १७४-६ अशी केली होती. पण जडेजा आणि विहारीनं किल्ला लढवत भारताला सन्मानपूर्वक अवस्थेमध्ये पोहोचवलं आहे. इंग्लंडकडून जेम्स अंडरसन, बेन स्टोक्स आणि मोईन अलीला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. तर स्टुअर्ट ब्रॉड, सॅम कुरन आणि आदिल रशीदला प्रत्येकी १ विकेट घेण्यात यश आलं.


या मॅचमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडचा डाव ३३२ रनवर संपुष्टात आला होता. ५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारत ३-१नं पिछाडीवर आहे.