टेस्ट क्रिकेटमध्ये सचिनला स्टम्पिंग करणारा एकमेव विकेटकीपर निवृत्त
एलिस्टर कूक आणि पॉल कॉलिंगवूड यांच्या निवृत्तीनंतर इंग्लंडच्या आणखी एका क्रिकेटपटूनं संन्यास घेतला आहे.
लंडन : एलिस्टर कूक आणि पॉल कॉलिंगवूड यांच्या निवृत्तीनंतर इंग्लंडच्या आणखी एका क्रिकेटपटूनं संन्यास घेतला आहे. इंग्लंडचा विकेटकीपर जेम्स फोस्टरनं निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. जेम्स फॉस्टरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द फारशी यशस्वी नसली तरी त्याच्या नावावर अनोखं रेकॉर्ड आहे. जेम्स फॉस्टर हा एकमेव विकेटकीपर आहे ज्यानं टेस्टमध्ये सचिन तेंडुलकरला स्टम्पिंग केलं. एसेक्सनं करार न वाढवल्यामुळे फोस्टरनं निवृत्तीचा निर्णय घेतला.
भारताविरुद्ध खेळली पहिली टेस्ट
38 वर्षांच्या फोस्टरनं इंग्लंडकडून 7 टेस्ट, 11 वनडे आणि 5 टी-20 मॅच खेळल्या. फोस्टरनं 3 ऑक्टोबर 2001 साली झिम्बाब्वेविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केलं. यानंतर तीन महिन्यांनी फोस्टरनं भारताविरुद्ध पहिली टेस्ट मोहालीमध्ये खेळली. फोस्टरचं वनडे आणि टेस्ट कारकिर्द जवळपास 1 वर्ष राहिली. 2002 सालानंतर फोस्टरनं एकही टेस्ट आणि वनडे मॅच खेळली नाही.
2009 साली टी-20मध्ये संधी
फोस्टरचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2009 साली पुनरागमन झालं. त्याची टी-20 कारकिर्द 11 दिवसांची होती. 5 जून 2009 साली फोस्टर नेदरलँडविरुद्ध पहिली टी-20 आणि याच्या 10 दिवसांनी वेस्ट इंडिजविरुद्ध आपली पाचवी आणि शेवटची टी-20 मॅच खेळला.
बंगळुरू टेस्टमध्ये सचिनला स्टम्पिंग केलं
जेम्स फोस्टरची टेस्ट कारकिर्द 7 टेस्ट मॅचपुरती मर्यादित राहिली. त्यानं या 7 मॅचमध्ये 17 कॅच आणि 1 स्टम्पिंग घेतला. बंगळुरू टेस्टमध्ये फोस्टरनं सचिनला अॅशले जायल्सच्या बॉलिंगवर स्टम्पिंग केलं. सचिननं आऊट व्हायच्या आधी 90 रन केले होते. आपल्या 200 टेस्ट मॅचच्या कारकिर्दीमध्ये सचिन एकदाच स्टम्पिंग झाला आहे.
भारताविरुद्धच सर्वाधिक स्कोअर
फोस्टरनं 7 टेस्ट मॅचमध्ये 25.11 च्या सरासरीनं 226 रन केले होते. यामध्ये त्याचा सर्वाधिक स्कोअर 38 रन होता. भारताविरुद्धच्या बंगळुरू टेस्टमध्येच त्यानं 38 रनची खेळी केली होती. फोस्टरनं 289 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 36.69 च्या सरासरीनं 13,761 रन केले होते.