पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर मुदस्सर नझर (Mudassar Nazar) याने मॅच फिक्सिंगच्या (Match Fixing) आरोपांवर भाष्य केलं आहे. भारताविरोधातील सामन्यातील प्रत्येक पराभवानंतर आमच्या देशातील लोकांना हा सामना फिक्स होता असंच वाटायचं असं सांगितलं. पाकिस्तान संघाला 21 व्या दशकात मॅच फिक्सिंगचा मोठा फटका बसला. मोहम्मद आमीर, मोहम्मद आसीफ, सलमान बट, शरजील खान आणि खालिद लतिफ यांच्यावर आयुष्यभरासाठी बंदी घालण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"तुम्ही जर 90 च्या दशकातील पाकिस्तानी संघ पाहिलात तर ऑस्ट्रेलिया संघाला स्पर्धा देणारा होता. पण यावेळी सतत पराभवाची भिती होती आणि मी इथे थोडं वादग्रस्त बोलणार आहे. मॅच फिक्सिंगमागे हा वाद आहे. पाकिस्तान संघावर खूप दडपण होते कारण प्रत्येक वेळी पराभवानंतर लोक संशयाने पाहायचे. हा सामना फिक्स  होता असंच लोकांना वाटायचं," असं मुदस्सर नझरने सांगितलं.


"आपण एका उत्तम संघासमोर पराभूत झालो आहोत हे मान्य करण्यास कोणीही तयार नव्हतं. 90 च्या दशकात जेव्हा मी संघाचा भाग होतो तेव्हा सुरुवातीच काही टप्प्यावर पराभवाची फार भिती होती. ही भिती मॅच फिक्सिंग किंवा लोकांना हा सामना फिक्स आहे असं वाटत असावं याची होती," असंही त्याने सांगितलं. अजमान (UAE) येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट टॉक शो - cricket predicta च्या 100 व्या भागाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कॉन्क्लेव्हच्या वेळी नाझर बोलत होता.


1976 ते 1989 या काळात पाकिस्तानसाठी 76 कसोटी आणि 122 एकदिवसीय सामने खेळलेल्या नझरला मॅच फिक्सिंगच्या भितीचा परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला असं वाटतं. पुढे त्याने सांगितलं की, "येथे आणखी एक बाब आहे, जो भारताविरोधात खेळताना महत्त्वाचा होता. कोणताही पाकिस्तानी, भारतीय पराभव पचवू शकत नव्हता. शारजामध्ये आपण हे पाहिलं आहे आणि त्यामुळेच तो मोठा इव्हेंट आहे. हे फक्त मैदानापुरतं मर्यादित नव्हतं, तर सामन्यांमध्येही होतं".


"फार दबाव असल्याने दुर्दैवाने मॅच फिक्सिंगच्या त्या कालखंडाचा पाकिस्तान संघावर फार परिणाम झाला," असं त्याचं म्हणणं आहे. अतिरिक्त दबावाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने मानसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती करायला हवी होती असं तुम्हाला वाटतं? असं विचारलं असता तो म्हणाला "मी मानसोपचार तज्ज्ञाला क्रिकेटचा सामना जिंकताना पाहिलेले नाही. जगभरातील अनेक संघांनी मानसोपचार तज्ज्ञांना नियुक्त केलं आहे. पण त्याचा उपयोग कधीच झाला नाही".