PCB Slams Jay Shah Over Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार आपल्या दुसऱ्या सामन्यात नेपाळवर 10 गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेमधील भारताचा दुसरा सामनाही पावसात वाहून जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच सुदैवाने पाऊस थांबला आणि अर्ध्या षटकांचा सामना खेळवण्यात आला. भारताचा पाकिस्तानविरुद्धचा स्पर्धेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. दुसऱ्या डावामध्ये पाऊस पडल्याने पाकिस्तानला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. नेपाळविरुद्धच्या सामन्यातही भारताच्या फलंदाजीला सुरुवात झाल्यानंतर पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला. मात्र सातत्याने या सामन्यांमध्ये पावसाचा अडखळा येत असतानाच पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य नझाम सेठी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच बीसीसीआयचे सचिव तसेच आशियाची क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जय शाह यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळेच आशिया चषक स्पर्धेतील सामन्यांचा बोजवारा उडाला असल्याचा दावा करत नझाम सेठी यांनी टीका केली आहे.


संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवा असं म्हटलेलं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर नझाम सेठी यांनी जय शाहांनी संपूर्ण आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानमध्ये किंवा युएईमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव कारण नसताना फेटाळून लावल्याचं म्हटलं आहे. "मी आशियाई क्रिकेट समितीचे अध्यक्ष असलेल्या जय शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी 3 वेळा विनंती केली. आशिया चषकाचे सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळवा असं माझं म्हणणं होतं. पाकिस्तानमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने सुरु झाले आहेत तर सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळवता येतील असं माझं सांगणं होतं," असं नझाम सेठी म्हणाले आहेत.


आम्ही आधीच इशारा दिला होता पण...


"माझं हे म्हणणं खोडून काढण्यात आल्यानंतर मी 5 सामने पाकिस्तानमध्ये आणि 8 सामने युएईमध्ये खेळवण्याचा सल्ला दिला. ही मागणीही त्यांनी खोटून काढली. आपण आशिया चषक खेळवण्याचे हक्क श्रीलंकेला देणार असल्याचं त्यांनी सूचक पद्धतीने सांगितलं. अखेर आम्ही जेव्हा या स्पर्धेत खेळणारच नाही असं सांगितलं तेव्हा त्यांनी 4 सामने पाकिस्तानमध्ये ठेवले आणि उर्वरित श्रीलंकेमध्ये आयोजित केले. श्रीलंकेमध्ये पावसाची शक्यता असल्याने त्याचा परिणाम सामन्यांवर, मालिकेवर होईल तसेच सामने पाहण्यासाठी प्रेक्षक प्रत्यक्ष मैदानात येणार नाहीत. ते सामन्यांकडे पाठ फिरवतील यासंदर्भात आम्ही इशारा दिला होता," असा दावाही नझाम सेठी यांनी केला आहे.


नक्की वाचा >> 'त्याला देशाबद्दल काहीच वाटत नाही'; मुलाच्या जन्मावरुन बुमराहवर सडकून टीका; धोनीचं मात्र कौतुक


आर्थिक दृष्ट्या योग्य पर्याय नाकारला


"तसेच युएईमधील मैदानांवर सामने भरवणे हे आर्थिक दृष्ट्या फायद्याचं ठरलं असतं. श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती पाहात युईए परवडण्यासारखा पर्याय होता. मात्र हे जय शाह यांना पटलं नाही तेव्हा एमिरिट्स क्रिकेट बोर्डाचे अधिकारी मुंबईला आले. त्यांनी बीसीसीआयला आशिया चषक युएईमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला. यापूर्वी इंडियन प्रमिअर लीगची 2 पर्व आणि आशियाई क्रिकेट परिषदेची एक स्पर्धा युएईमध्ये आयोजित करण्यात आल्याचं बीसीसीआयला सांगण्यात आलं. मात्र बीसीसीआयने त्यांची विनंती मान्य केली नाही," असा दावाही सेठी यांनी केला आहे.



जय शाहांनाच ठाऊक


"पाकिस्तान आणि युएईचे पर्याय का नाकारण्यात आले आणि सर्व परिस्थिती, कारणं आणि तर्क बाजूला ठेवत श्रीलंकेला का प्राधान्य देण्यात आलं हे फक्त जय शाहाच सांगू शकतात. श्रीलंकेतील मैदानांची निवड आणि सामन्यांचं आयोजन हे (पावसामुळे) अडचणीचं ठरत असल्याचं आपल्याला दिसून आलं आहे," असा टोलाही सेठी यांनी लगावला आहे.


सामने दुसरीकडे खेळवले जाणार


आशिया चषक स्पर्धेतील सुपर-4 आणि अंतिम सामन्याचा मान श्रीलंकेला देण्यात आला आहे. कोलंबात 9, 10, 12, 14 आणि 15 सप्टेंबरला आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये सुपर-4 चे सामने खेळवले जाणार आहेत. पण कोलंबोत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे कोलंबोत वाताहात झाली आहे. दुसरीकडे कँडीतही पावसाने हजेरी लावली आहे. 2 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान कँडीतल्या पल्लेकल स्टेडिअममध्ये खेळवण्यात आला होता. पण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोलंबोत खेळवले जाणारे सर्व सामने कँडीत पल्लेकल स्टेडिअमध्ये हलवण्याचा विचार सुरु आहे. दांबुला स्टेडिअमचाही पर्याय आहे. पण दांबुला स्टेडिअमवर प्लड लाईट्सचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. दरम्यान श्रीलंकेतल्या हॉटेलमधल्या सुविधेवर टीम इंडियाचे खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. सुपर फोरचे सामने 6 सप्टेंबर पासून खेळवले जाणार आहे. सुपर-4मध्ये पहिल्या सामन्यात म्हणजे 10 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार आहेत. पण हा सामनाही रद्द होण्याची शक्यता आहे. पुढचा संपूर्ण आठवडा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.