सामन्याच्या दिवशी लंच ब्रेकमध्ये क्रिकेटर्स नेमका कसा आहार घेतात?
इतका वेळ मैदानावर टिकून राहण्यासाठी खेळाडूंना तसा आहार मिळणंही गरजेचं असतं.
मुंबई : खेळ कोणताही असो, त्यासाठी फिटनेस हा महत्त्वाचा...आणि फीट राहण्यासाठी आहारावर लक्ष द्यावचं लागतं. क्रिकेट खेळताना हा फिटनेस फार महत्त्वाचा असतो. कारण क्रिजवर बराच वेळा फलंदाजी करण्यासाठी उभं रहावं लागतं. मात्र सामन्यादरम्यान लंच ब्रेक, टी- ब्रेक यांसारख्या ब्रेकदरम्यान खेळाडू नेमकं काय खातात? हा प्रश्न कधी तुमच्या मनात आलाय का?
टेस्ट क्रिकेटमध्ये खेळाडूंची जणू कसोटी लागलेली असते. या फॉर्मेटमध्ये दरदिवशी 3 सत्र खेळवले जात असून सुरुवातीच्या 2 तासांच्या खेळानंतर खेळाडूंना लंच ब्रेक मिळतो. यानंतर खेळाडू पुन्हा 2 तास खेळल्यानंतर टी-ब्रेकसाठी जातात. टी-ब्रेक झाल्यानंतर पुन्हा अडीच तासांचा खेळ असतो. इतका वेळ मैदानावर टिकून राहण्यासाठी खेळाडूंना तसा आहार मिळणंही गरजेचं असतं.
टेस्ट सामन्यापूर्वी खेळाडू सर्वात चांगला ब्रेकफास्ट घेतात. यामध्ये ते सकाळी दुधाबरोबर सीरियल, पास्ता आणि फळं खातात. याव्यतिरिक्त काही खेळाडू मांस, सलाड, जॅम किंवा पीनट बटरसोबत सँडविच खातात. पहिल्या सेशननंतर खेळाडू जेव्हा लंचसाठी जातात, तेव्हा खेळाडूंना दुपारच्या जेवणात 3 ते 4 प्रकारचे पदार्थ दिले जातात.
यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रोट्यांसह हिरव्या पालेभाज्या, शिजवलेले बटाटे आणि डाळ या गोष्टी मुख्य असतात. यावेळी काही खेळाडूंना मांसाहारी पदार्थही आवडतात. अशा खेळाडूंसाठी चिकन, मासेही असतात. याव्यतिरिक्त अधिकतर खेळाडूंची आवडती आईसक्रीमही दिली जाते.
जे खेळाडू सेशनमध्ये फलंदाजी करतात, ते अधिकतर फळं किंवा प्रोटीन बार खातात. खेळाडू जे काही खातात, त्यामध्ये फॅटचे प्रमाण कमी आणि कार्बोहाइड्रेटचे प्रमाण जास्तच असतं. लंचनंतर 2 तासांचा खेळ झाल्यावर खेळाडू पुन्हा एकदा फ्रेश होण्यासाठी मैदानातून बाहेर जातात. यावेळी खेळाडू चहा किंवा कॉफीसोबतच हलका नाश्ता करतात.
शेफबद्दल बोलायचं झालं तर काही खेळाडू स्वत:चा शेफही ठेवतात. त्यामुळेच खेळाडूंना कोणताही त्रास होत नाही. तर डिनरच्या वेळीही क्रिकेटर्स एनर्जी देणारे पदार्थच खातात.