शोएब मलिक करत होता फील्डिंग, भारतीय फॅन्स ओरडत होते `जीजू-जीजू`
शोएब मलिकने जिंकलं अनेकांचं मन
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याकजडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असतं. रविवार आशिया कप 2018 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब मलिकने भारताविरोधात 78 रनची खेळी केली. ज्यामुळे पाकिस्तानला सन्मानजनक धावा करता आल्या. पण पाकिस्तानला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण या सामन्यादरम्यान शोएब मलिकने भारतीय फॅन्सचं मन जिंकलं.
भारतीय टीमसमोर पाकिस्तानची टीम फ्लॉप ठरली. मागच्या सामन्यात देखील भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. भारताचा 'गब्बर' शिखर धवन आणि 'हिटमॅन' रोहित शर्माच्या पुढे पाकिस्तानची टीम टिकू नाही शकली. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या शिखर धवन आणि रोहित शर्माने शतक ठोकत पाकिस्तानच्या आशेवर पाणी फेरलं.
पाकिस्तानचे फॅन्स जरी निराश झाले असले तरी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने भारतीय फॅन्सचं हद्य जिंकलं. सोशल मीडियावर सध्या एक व्हि़डिओ चांगलाच व्हायरल होत आहे. फिल्डिंग करत असताना शोएब मलिक बाउंड्रीवर उभा होता तेव्हा एका भारतीय फॅनने शोएब मलिकला जीजू-जीजू म्हणून हाक मारली. त्यानंतर शोएब मलिकने त्या भारतीय फॅन्सकडे हात दाखवत स्मित हास्य दिलं. या व्हि़डिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
आतापर्यंत 70 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. 900 हून अधिक लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक याने भारताची टेनिस स्टार सानिया मिर्जासोबत विवाह केला आहे.