पान मसाल्यावर ज्ञान देणारे बघा कोणत्या जाहिरातीत झळकलेत; गंभीरची `ती` जुनी Ad Viral
Fans Share Old Ad Of Gautam Gambhir: गौतम गंभीरने पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या क्रिकेटपटूंवर निशाणा साधताना अशा जाहिराती करणं लज्जास्पद असल्याचा टोला लगावल्यानंतर अनेकांनी गंभीरची ही जुनी जाहिरात व्हायरल केली आहे.
Fans Share Old Ad Of Gautam Gambhir: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पान मसाल्याची जाहिरात (Pan Masala Ad) करणाऱ्या क्रिकेटपटूंवर सडकून टीका केली आहे. पैसा कमवण्यासाठी इतर बरेच मार्ग आहेत. त्यासाठी पान मसाल्याची जाहिरात करण्याची गरज नाही असं विधान गंभीरने एका मुलाखतीमध्ये केलं आहे. इंडियन प्रीमिअर लिगच्या यंदाच्या पर्वादरम्यान सुनिल गावस्कर, वीरेंद्र सेहवाग आणि कपिल देव यांनी काम केलेली पान मसाल्याची जाहिरात फारच चर्चेत होती. त्यामुळे गंभीरने अप्रत्यक्षपणे या खेळाडूंवर निशाणा साधल्याची चर्चा आहे. आपले आदर्श कोण हे निवडताना आपण काळजी घेतली पाहिजे, असा टोलाही गौतम गंभीरने लगावला. मात्र गंभीरचं हे विधान व्हायरल झाल्यानंतर आता अनेकांनी त्याला त्याच्या एका जुन्या जाहिरातीची आठवण करुन दिली आहे. ही जाहिरात एका मद्यविक्री करणाऱ्या कंपनीची आहे.
गंभीर काय म्हणाला?
एका मुलाखतीमध्ये गंभीरला पान मसाल्याची जाहिरात करण्यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला असता तो या प्रश्नावरुन संतापला. पान मसाल्याच्या जाहिराती करणे फार लज्जास्पद आणि निराशाजनक आहे, असं गंभीर म्हणाला. "हे लज्जास्पद आणि निराशाजनक एवढ्या 2 शब्दांत मी याचं वर्णन करेन.एखादा खेळाडू पान मसाल्याची जाहिरात करेल असा विचार मी कधीच केला नव्हता. मी अनेकदा एकच गोष्ट सांगतो आणि यापुढेही सांगत राणार आहे की आपला आदर्श निवडताना अनेकदा विचार करायला हवा. कोणत्याही व्यक्तीचं नाव महत्त्वाचं नसतं तर त्याचं काम महत्त्वाचं असतं," असा टोला गंभीरने थेट कोणाचंही नाव न घेता लगावला.
गंभीरने पैशांवरुनही क्रिकेटपटूंना ऐकवलं
पैसे कमवण्यासाठी बरेच मार्ग असल्याचा टोला गंभीरने लगावला. "कोणतीही व्यक्ती केवळ त्याच्या नावाने नाही तर कर्माने ओळखली जाते. पैशासाठी एखाद्या पान मसाल्याची जाहिरात करण्याइतका पैसा महत्त्वाचा आहे असं मला वाटत नाही. पैसाच कमवायचा असेल तर त्यासाठी इतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करता येतील. तुम्ही थोडा पैसा सोडलाही पाहिजे कारण तुम्ही तरुणांचे आदर्श आहात. त्यामुळेच थोडा पैसा सोडण्याची हिंमत तुम्ही दाखवायला हवी," असं गंभीर म्हणाला.
गंभीरची जाहिरात चर्चेत
गंभीरने अनेक माजी खेळाडूंना अप्रत्यक्षपणे टोला लगावल्यानंतर अनेकांनी त्याची एक जाहिरात व्हायरल केली आहे. या जाहिरातीमध्ये तो त्याच्या वडिलांचा दाखला देत आपण आयुष्यात काही मोठं केलं आहे की नाही याबद्दल स्वत:ला प्रश्न विचारत असल्याचं सांगतो. ही एका मद्यविक्री करणाऱ्या कंपनीची जाहिरात आहे. अनेकांनी गंभीरची स्थिती 'लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण' अशी झाली असल्याचं म्हटलं आहे. ही जाहिरात नेमकी काय आहे पाहूयात...
अनेकांनी गौतमला केलं लक्ष्य
एकाने गौतम गंभीरला कदाचित ही कंपनी काय करते हे ठाऊक नसेल असा उपहासात्मक टोला लगावला आहे. तर अन्य एकाने मद्याची जाहिरात करणारा पान मसाल्यावरुन ऐकवतोय असं म्हटलं आहे. यावरील लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत पाहूयात..
3 कोटी सोडले...
गंभीरने दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना आपण मध्येच कर्णधारपद सोडलं होतं तेव्हा 3 कोटी रुपयांच्या मानधनावर पाणी सोडल्याचा दाखलाही या मुलाखतीत दिला होता. मला ते पैसे घेता आले असते पण आपण इतरांसाठी आदर्श असतो तेव्हा आपण सोडण्याची वृत्ती जोपासली पाहिजे असं गंभीर स्वत:चं उदाहरण देत म्हणालेला.