शेवटची मॅच खेळला हा भारतीय? NZ कडून पराभवानंतरच्या `त्या` कृतीने चर्चांना उधाण; पाहा Video
Indian Cricket Fans Speculate After Bengaluru Test: भारतीय संघाला मागील 10 वर्षांमध्ये मायदेशात पराभूत करणारा न्यूझीलंडचा संघ का केवळ तिसरा संघ ठरला आहे. असं असतानाच या खेळाडूच्या कृतीने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
Indian Cricket Fans Speculate After Bengaluru Test: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा पराभवाचा धक्का बसला आहे. बंगळुरुमधील पहिल्या सामन्यात भारत 8 गड्यांनी पराभूत झाला. मागील 10 वर्षांमध्ये भारतात भारताला पराभूत करणारा न्यूझीलंड हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतरचा केवळ तिसरा संघ ठरला आहे. मात्र या सामन्यातील पराभवानंतर सर्वाधिक टीका होत आहे ती के. एल. राहुलवर! पहिल्या आणि दुसऱ्या डावातही के. एल. राहुलला नावाला साजेशी कामगिरी करत आलेला नाही.
अनेकांच्या भुवया उंचावल्या
32 वर्षीय के. एल. राहुलने या सामन्यात केवळ 12 धावा केल्या. पहिल्या डावात तर त्याला भोपळाही फोडता आला नाही. मात्र सामना संपल्यानंतर के. एल. राहुलने केलेल्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं असून हे त्याच्या निवृत्तीचे संकेत तर नाहीत ना असं म्हटलं जात आहे. पाचव्या दिवशी न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत केल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करुन पव्हेलियनकडे जात असतानाच के. एल. राहुलने मैदानावर केलेल्या एका कृतीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागील बऱ्याच काळापासून त्याच्यावर वाईट कामगिरीमुळे टीकेची झोड उठलेली असतानाच त्याची ही कृती सर्वांच्याच नजरेत भरली.
नेमकं त्याने मैदानात काय केलं?
दोन्ही संघांचे खेळाडू सामना संपल्यानंतर चालत पव्हेलियनकडे जात असतानाच के. एल. राहुलने मैदानात सोडण्यापूर्वी दोन्ही हातांनी मैदानाला स्पर्श करुन तो हात कपाळाला लावला. के. एल. राहुल मैदानाचा पाया पडल्याचे हे क्षण कॅमेरात टीपले गेले आणि अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अनेकांनी के. एल. राहुल त्याचा शेवटचा अंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला आहे असं हा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर म्हटलं आहे. टी-20 आणि एकदिवसीय संघामधून यापूर्वीच के. एल. राहुलने आपलं स्थान गमावलं आहे. सातत्यपूर्ण कामगिरी न करता आल्याने के. एल. राहुलला आधीच मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघातून बाहेर काढण्यात आलं आहे. आता कसोटीमधूनही त्याला डच्चू दिला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्याला दुसऱ्या कसोटीत डच्चू?
शुभमन गिलला दुसऱ्या कसोटीमध्ये संधी दिली जाईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरी कसोटी 24 तारखेपासून सुरु होत आहे. सफराज खानने दमदार शतक झळकावत आपलं स्थान पुढील कसोटीसाठी निश्चित केलं आहे. त्यामुळेच आता के. एल. राहुललाच बाहेर काढलं जाईल असं सांगितलं जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी याच मैदानावर खेळताना के. एल. राहुलने तीन डावांमध्ये 3 अर्धशतकं झळावली होती.
रोहितचं सूचक विधान
के. एल. राहुलचा थेट उल्लेख न करता सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सुचक विधान केलं आहे. "हे पाहा, मी काही प्रत्येक सामन्यानंतर प्रत्येकाशी जाऊन बोलणाऱ्यातला नाही. ते त्यांच्या खेळात कुठे उभे आहेत, करिअरमध्ये कुठे उभे आहेत हे त्यांना माहीत आहे. आम्ही फक्त एका खेळावर, किंवा मालिकेच्या आधारे आमची मानसिकता बदलत नाही. त्यांना माहित आहे की ते कुठे उभे आहेत आणि संघाची परिस्थिती काय आहे हे त्यांना सुरुवातीपासून माहिती असतं. मी त्यांच्याशी जे बोलतोय त्यापेक्षा मी काही वेगळे बोलणार आहे असे मला वाटत नाही,” असं रोहित शर्मा म्हणाला आहे.