कोलकाता : भारतात आयोजित करण्यात आलेल्या फिफा अंडर १७ फुटबॉल वर्ल्डकपमध्ये भारताने नवा इतिहास रचलाय. भारतात आयोजित फिफा अंडर १७ वर्ल्डकप ही सर्वाधिक पाहिली गेलेली स्पर्धा ठरलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकातामध्ये शनिवारी तिसऱ्या स्थानासाठी ब्राझील आणि माली यांच्यात लढत झाली. त्यानंर अंतिम सामना इंग्लंड आणि स्पेन यांच्यात झाला. भारताने आयोजित केलेल्या स्पर्धांच्या इतिहासात सर्वाधिक प्रेक्षक लाभलेली स्पर्धा म्हणजे फिफा अंडर १७ वर्ल्डकप. याआधी हा रेकॉर्ड चीनच्या नावे होता. १९८५मध्ये झालेल्या अंडर १७ वर्ल्डकपमध्ये प्रेक्षकांची संख्या १२ लाख ३० हजार ९७६ इतकी होती. 


शनिवारी ब्राझील आणि माली यांच्यातील सामना पाहण्यासाठी कोलकाताच्या सॉल्टलेक स्टेडियममध्ये तब्बल ५६, ४३२ प्रेक्षक होते आणि अंतिम सामन्याआधी भारताच्या सहा शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्डकप प्रेक्षकांची संख्या १२ लाख ८० हजार ४५९ वर पोहोचली. यामध्ये भारताने चीनला मागे टाकले. 


भारताच्या या रेकॉर्ड करण्यामध्ये कोलकाताच्या सॉल्टलेक स्टेडियमचा मोठा वाटा आहे. वर्ल्डकपमधील १० सामन्यांमध्ये ५ लाख ४२ हजार १२५ प्रेक्षक या स्टेडियममध्ये आले होते. म्हणजेच प्रत्येक सामन्याला ५४,२१२ प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ६६,६०० इतकी आहे.