FIFA WC 2022 Japan Vs Spain: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत अनेक उलटफेर पाहायला मिळाले आहेत. सौदी अरेबियाने अर्जेंटिना (Saudi Arebia Vs Argentina) पराभूत करत क्रीडाप्रेमींना धक्का दिला होता. मात्र असं असलं तरी सुपर 16 फेरीत अर्जेंटिनाने धडक मारली आहे. दुसरीकडे जापान विरुद्ध स्पेन या सामन्यातील एका गोलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. जापानच्या (Japan) टनाकानं ( Ao Tanaka) मारलेल्या गोलमुळे वादाला फोडणी मिळाली आहे. टनाकाच्या गोलपूर्वी सामन्यात 1-1 अशी बरोबरी होती. मात्र या गोलमुळे 2-1 ने विजय मिळवला आणि जापाननं सुपर 16 मध्ये एन्ट्री मारली. जापानच्या विजयामुळे जर्मनीचं वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या डावात स्पेनकडे 1 गोलची आघाडी होती. मात्र दुसऱ्या डावात जापाननं जोरदार कमबॅक केलं आणि रित्सू डोएननं गोल मारत बरोबरी साधली. त्यानंतर लगेचच तीन मिनिटांनी म्हणजेच 51 व्या मिनिटाला ओ टनाकानं के मिटोमाच्या मदतीने गोल मारला. यामुळे सामन्यात 2-1 ने आघाडी मिळाली. मात्र हा गोल वादात अडकल्याने VAR (Video Assistant Referee) रिव्ह्यू घेण्यात आला. यात जापानच्या बाजूने निकाल दिला. या निर्णयानं जर्मनीचं फुटबॉल वर्ल्डकपमधील स्वप्न भंगलं आहे. मात्र नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केलं आहे.







जापानच्या विजयामुळे स्पेन आणि जर्मनीचे गुण एकसारखे झाले. मात्र गोलच्या सरासरीमुळे जर्मनीला बाहेर रस्ता दाखवण्यात आला. आता सुपर 16 फेरीत जापानचा सामना क्रोएशिया सोबत 5 डिसेंबरला असणार आहे. तर स्पेनचा सामना मोरोक्कोसोबत 6 डिसेंबरला असणार आहे.