मुंबई : फिफा वर्ल्ड कपमध्ये व्हिडिओ असिस्टंट रेफ्रीचा वापर प्रथमच केला जात आहे. खेळातील पारदर्शकता वाढेल आणि निर्णय अधिकाधिक अचूक घेतले जातील, या उद्देशानं अशाप्रकारे तंत्रज्ञानाची मदत घेतली गेली खरी मात्र व्हिएआर पद्धतीवर बरेच जण टीका करत आहेत. व्हिडिओ असिस्टंट रेफ्रीमुळे फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये एका नव्या क्रांतीला सुरुवात होईल अशी आशा फुटबॉल विश्वातून व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात या नव्या तंत्रज्ञानाचा वापर वादग्रस्त ठरलाय. काहींच्या मते तर या नव्या तंत्रज्ञानामुळे यावेळेचा वर्ल्ड कप हा निकृष्ट दर्जाचा होत आहे. व्हीएआरचा निर्णय वेळखाऊ आणि कंटाळवाणा आहे. याचा रिप्ले स्टेडियममधील दर्शकांना दाखवला जात नसल्यानं याबाबत दर्शकांसाठी गूढ निर्णय ठरतो. याखेरीज यामुळे मैदानावरील रेफरीला मदत जरी होत असली तरी त्रुटी किती प्रमाणात कमी झाल्या याबाबतही मतभेद आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पेन आणि इराण दरम्यानच्या लढतीत या प्रणालीनं निर्णय द्यायला तब्बल चार मिनिटांचा वेळ घेतला. यावेळात मैदानावरील स्क्रीनवर काहीच दाखवलं जात नसल्यानं दर्शक आणि खेळाडूंना काहीच कळलं नाही.. तर इंग्लंड आणि ट्युनिशिया लढती दरम्यान इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनला दोन वेळा पेनल्टी क्षेत्रात पाडण्यात आलं. पण व्हिएआरनं याची दखल घेतली नाही.


ब्राझीलविरुद्ध स्विर्झलँडच्या स्टिव्हन झुबेरनं गोल केला. त्यावेळी त्यानं ब्राझीलच्या मिरांडाला ढकललेलं टीव्ही रिप्लेत स्पष्टी दिसून आलं. त्याचीही दखल घेतली गेली नाही. आतापर्यंत या प्रणालीद्वारे १२ निर्णय घेण्यात आले. यातील सहा निर्णय हे योग्य मानले जात असून इतर सहा निर्णय हे प्रेक्षकांना वादग्रस्त वाटत आहेत. 


अशा चुका मैदानावरील रेफरीकडून घडतच असतात. या प्रणालीमुळे अशा चुका टळतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात ही यंत्रणाही त्याच चुका करताना दिसत आहे. अशा प्रकारच्या अचूक नसलेल्या प्रणालीचा वापर करुन दिलेला निर्णय चुकीचा ठरल्यास निकालावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. मग या प्रणालीचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


खेळातील नाट्य आणि भावना मारुन टाकणारी ही प्रणाली आहे असं मत काही दिग्गज संघांच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या वादग्रस्त निर्णयांमुळे व्हीएआर सध्या वर्ल्ड कपमधील फॅन्सच्या चर्चेचा विषय ठरलाय.