कोलकाता : ऐतिहासिक अशा डे-नाईट टेस्टचा पहिला दिवस हा भारताचा ठरला आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात सुरु झालेल्या या मॅचमध्ये बांगलादेशने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण बांगलादेशचा फक्त १०६ रनवर ऑलआऊट झाला. यानंतर दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर १७४/३ एवढा झाला आहे. त्यामुळे भारताला ६८ रनची आघाडी मिळाली आहे. दिवसाअखेरीस विराट कोहली ५९ रनवर नाबाद आणि अजिंक्य रहाणे २३ रनवर नाबाद आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशचा पहिल्या इनिंगमध्ये लवकर ऑलआऊट झाल्यानंतर भारतालाही सुरुवातीला धक्के बसले. मयंक अग्रवाल १४ रनवर आणि रोहित शर्मा २१ रनवर आऊट झाले. पहिल्या दोन विकेट गेल्यानंतर पुजारा आणि विराटने भारताचा डाव सावरला. चेतेश्वर पुजारा ५५ रन करुन आऊट झाला. बांगलादेशच्या एबादात हुसेनला २ आणि अल अमीन हुसेनला १ विकेट मिळाली आहे.


बांगलादेशला १०६ रनवर ऑलआऊट करण्यात इशांत शर्माने सगळ्यात मोठी भूमिका बजावली. इशांत शर्माने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या आहेत. तर उमेश यादवला ३ आणि मोहम्मद शमीला २ विकेट मिळाल्या.


भारत हा पहिल्यांदाच डे-नाईट टेस्ट मॅच खेळत आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानामध्ये हा सामना सुरु आहे. डे-नाईट टेस्ट मॅच असल्यामुळे नेहमीच्या लाल बॉलऐवजी गुलाबी बॉलने ही मॅच खेळवली जात आहे.