मुंबई : महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीसारख्या अव्वल दर्जाच्या क्रिकेटपटूंशी संपर्क साधून सट्टेबाज आपला वेळ कधीच वाया घालवत नाहीत, असं बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख अजित सिंह यांचं म्हणणं आहे. युवा, अपयशी किंवा ज्यांना पैसा आकर्षित करतो अशा खेळाडूंना सट्टेबाज लक्ष्य करत असल्याचं अजित सिंह यांचं म्हणणं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी आणि विराटसारख्या खेळाडूंना त्यांची प्रतिष्ठा कोणत्याही इतर बाबींपेक्षा मोठी असते. यामुळे असे खेळाडूही अशा प्रकरणात कधी अडकत नसल्याचं अजित सिंह म्हणाले. सध्या तामिळनाडू प्रीमियर लीगमधील फिक्सिंगप्रकरणावरुन क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.


आपल्याला अनोळखी व्यक्तींकडून संपर्क करण्यात येत आहे आणि विशेष संदेश देण्यात येत आहे, अशी तक्रार टीएनपीएल खेळणाऱ्या खेळाडूंनी केली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार काही मॅच फिक्सर टीएनपीएलला आपल्या नियंत्रणात घेण्याचा प्रयत्न करत आहेत, तसंच टीमच्या मालकांशी त्यांचा संपर्क आहे. सट्टेबाजीसाठी फायदा होण्यासाठी टीम संचालन तशाप्रकारे करण्याचा प्रयत्नही होत असल्याचा आरोप होत आहे.


बुकी आणि मॅच फिक्सरची नजर आता टीम इंडियाच्या महिला क्रिकेटपटूंवर आहे. फिक्सर्स महिला क्रिकेटपटूंशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख अजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियाच्या एका महिला खेळाडूशी फिक्सरने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फेब्रुवारी महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या वनडे सीरिजदरम्यान असा प्रयत्न झाला. यानंतर त्याला खेळाडूंना संपर्क करु नकोस, असं आयसीसीकडून सांगण्यात आलं.


फिक्सरने संपर्क केल्याची माहिती महिला क्रिकेटपटूने आयसीसीला सांगितली. यानंतर भ्रष्टाचार विरोधी पथकाने बंगळुरूमध्ये दोन जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.