India vs England Test: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या एका विधानाची सध्या क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे. याचं कारण रोहित शर्माने (Rohit Sharma) अगदी स्पष्ट शब्दांत खेळाडूंना इशारा दिला आहे. जर खेळाडूंमध्ये यशाची भूक नसेल तर त्यांना संघात घेऊन काय करायचे असं सांगत त्याने अप्रत्यक्षपणे काही खेळाडूंवर निशाणा साधला आहे. नव्याने संधी मिळालेले यशस्वी, सरफराज, ध्रुव पटेल, आकाश दीप चांगली कामगिरी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्याने हे विधान केलं आहे. तसंच त्याने रणजी खेळण्यास उत्सुक नसलेल्या ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. बीसीसीआयनेही खेळाडू स्थानिक क्रिकेटच्या तुलनेत आयपीएलला पसंती देत असल्याने नाराजी जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रांचीमध्ये इंग्लंडचा पराभव केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रोहित शर्माला सध्या सुरु असलेल्या आयपीएल विरुद्ध कसोटी या चर्चेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्याने तात्काळ उत्तर देत कसोटी सर्वात कठीण प्रकार असून, ज्यांच्यात जिंकण्याची भूक नाही अशा खेळाडूंना तात्काळ ओळखता येतं असं उत्तर दिलं. 


"मी भारतीय कर्णधाराच्या मताशी सहमत आहे. सर्वात मोठ्या प्रकारात खेळण्यासाठी तरुण खेळाडूंमध्ये भूक हवी," असं मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिलाष खांडेकर पीटीआयशी बोलताना म्हणाले आहेत. बीसीसीआयने या महिन्याच्या सुरुवातीला करारबद्ध खेळाडूंना रणजी सामन्यांमध्ये खेळण्याचा आदेश दिला आहे. 


राज्य संघटनांच्या अनेक प्रतिनिधींनी कबूल केलं की रोहितने जे लोक यासाठी तयार नाहीत त्यांना सर्वात कठीण फॉर्मेटसाठी विचारात घेऊ नये असं सांगितलं. पण अशी परिस्थिती कधीच उद्भवू नये, अशी व्यवस्था असायला हवी, असंही त्यांना वाटतं. "रणजी ट्रॉफीला कोणत्याही खेळाडून हलक्यात घेऊ नये. भारतीय क्रिकेटचा तो कणा आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये ही सर्वात महत्त्वाची स्पर्धा आहे. इतर स्थानिक क्रिकेटमध्येही हा फॉरमॅट असायला हवा," असं अभिलाष खांडेकर म्हणाले आहेत.


दरम्यान दुसऱ्या एका अधिकाऱ्याने आपलं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं आहे की, जर रणजी खेळणं अनिवार्य केलं नाही तर धीम्या गतीने ती संपत जाईल. त्यामुळे बीसीसीआयने घेतलेला निर्णय फार महत्वपूर्ण आहे. "खेळाडूंना रणजी खेळणं अनिवार्य करण्याच्या या निर्णयासाठी मी बीसीसीआयचं अभिनंदन करतो. उशीर होण्यापेक्षा हे चांगलं आहे. यामुळे स्थानिक क्रिकेटला फार फायदा होईल," असा विश्वास अभिलाष खांडेकर यांनी व्यक्त केला आहे.


दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी रणजी खेळल्यास नेमका काय फायदा होईल हे समजावून सांगितलं आहे. "रणजी खेळणं फार महत्त्वाचं आहे. यामुळे तुम्हाला भारतीय विकेटवर फिरकी चांगल्या पद्धतीने खेळण्याचा अनुभव मिळतो. तुमचं कौशल्य सुधारतं. आणि जेव्हा तुम्ही परदेशी संघाविरोधात खेळता तेव्हा फिरकीविरोधात खेळताना अडचण येत नाही," असं वेंगसरकर म्हणाले.


"मला असं वाटतं की रणजी खेळावं की नाही ही खेळाडूची इच्छा आहे. जर त्याला खेळायचे नसेल, तर आपल्याकडे भारतात पुरेसे पर्याय आहेत. ते खेळतील आणि स्वत: ला स्थापित करतील. खेळापेक्षा कोणीही मोठा नाही. कोणीही कायमस्वरुपी नाही," असंही ते म्हणाले.