न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर माजी भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीने  (Manoj Tiwary) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) दोन चुकांना अधोरेखित केलं आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. यासह न्यूझीलंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. मनोज तिवारीने यावेळी भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला (Gautam Gambhir) रोहित शर्माला (Rohit Sharma) योग्य मार्गदर्शन न केल्याबद्दल जबाबदार धरलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घऱच्या मैदानावर कसोटीमधील दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत आऱ अश्विन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावे 197 विकेट्स आहेत. पण तरीही न्यूझीलंडला 107 धावांची गरज असताना रोहितने आऱ अश्विनला उशिरा गोलंदाजीला आणलं. न्यूझीलंडला फक्त 10 धावांची गरज असताना आऱ अश्विन गोलंदाजीसाठी आला. मनोज तिवारीने यावरुन टीका केली असून, रोहित शर्माने जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन जोडीला गोलंदाजी द्यायला हवी होती असं मत मांडलं आहे. 


"रोहितने आपण मैदान समजून घेण्यास चुकलो हे मान्य केलं आहे. यामुळेच भारताने चुकीची प्लेईंग 11 निवडली. भारताने दोन ऐवजी तीन फिरकीपटूंना खेळायला हवं होतं. एका फिरकी गोलंदाजाला जास्त संधी मिळणार नाही असं मी म्हटलं होतं, पण तो अश्विन असेल असं मला वाटलं नव्हतं. त्याच्या नावे 500 विकेट्स आहेत. जेव्हा तुमच्याकडे फक्त 107 धावांचं आव्हान आहे तेव्हा जसप्रीत बुमराहसह त्यालाही आक्रमण कऱण्यासाठी आणायला हवं," असं मनोज तिवारीने Cricbuzz ला सांगितलं.


चांगले कर्णधार चुका करतात हे मान्य करताना मनोज तिवारीने यावेळी कर्णधाराचं मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षकाने पुढे यायला हवं होतं, ज्यात ते अपयशी ठरले असंही सांगितलं. "कधीकधी चांगले कर्णधार चुका करतात. यामुळेच मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. तसं का झालं नाही याची मला कल्पना नाही," असं मनोज तिवारीने म्हटलं.


'आकाशदीपला धक्का बसला असेल'


मनोज तिवारीने यावेळी भारताने मोहम्मद सिराजचा दुसरा जलदगती गोलंदाज म्हणून विचार करावा असं सुचवलं आहे. गौतम गंभीर आणि रोहितने मोहम्मद सिराजला विश्रांती द्यावी आणि फॉर्ममध्ये असणाऱ्या आकाशदीपला संधी द्यावी असं तो म्हणाला आहे. आकाशदीपने बांगलादेशविरोधातील दोन कसोटी सामन्यात 5 विकेट्स घेतले. तसंच दुलीप ट्रॉफीत 9 विकेट पटकावले. याशिवाय मयांक यादवचाही विचार करु शकतो असं तो म्हणाला आहे. 


“मला वाटतं की, जर एखादा गोलंदाज लयीत असेल, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये विकेट घेत असेल आणि त्याच्यात एक्स फॅक्टर असेल तर त्याला संघात घ्या आणि खेळवा. सिराजने यावर्षी कसोटीतील दुसऱ्या डावात एकही विकेट घेतलेली नाही, जी खूपच चिंताजनक आहे. त्याला काही सामने विश्रांती द्यायला हवी होती, जेणेकरून त्याला मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि गोलंदाजीवर काम करण्यास वेळ मिळेल. आमच्याकडे भरपूर बॅकअप गोलंदाज आहेत. आकाश दीपने बांगलादेशविरुद्ध प्रभावी कामगिरी केली. त्याचा आत्मविश्वास उंचावला होता. अशा परिस्थितीत पहिली कसोटी न खेळण्याची त्याने कल्पनाही केली नसेल. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे नाव न पाहता त्याला धक्का बसला असेल. पण तो नव्या उमेदीने येईल हे निश्चित आहे. तुमच्याकडे मयंक यादवही आहे. त्याच्यासारख्या खेळाडूंचा वापर करायला हवा होता,” असं तो म्हणाला.