बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळल्याने ईशान किशन आणि श्रेयस अय्यर चर्चेत असून, वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. स्थानिक क्रिकेटकडे दुर्लक्ष करत असल्याने बीसीसीआयने त्यांच्यावर कारवाई केली आहे. बीसीसीयआने सर्व खेळाडूंना भारतीय संघाकडून खेळत नसताना तसंच दुखापतग्रस्त नसताना रणजी खेळावी लागेल असं स्पष्ट सांगितलं आहे. यानंतर अनेक आजी-माजी खेळाडू आपलं मत व्यक्त करत आहेत. त्यातच आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज प्रवीण कुमारने ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला खडे बोल सुनावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआय स्थानिक क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत करत असताना, दोन्ही खेळाडू रणजीमधील सामन्यात सहभागी होत नसल्याने कारवाई करण्यात आली आहे. यावर प्रवीण कुमारने म्हटलं आहे की, क्रिकेटर्सनी पैसा कमवावा, पण त्यासाठी स्थानिक क्रिकेटकडे दुर्लक्ष करता कामा नये. यावेळी त्याने खेळाडूंना आयपीएलच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला जास्त महत्व द्या, तसंच करिअरमध्ये दोन्हींचा समतोल राखा असा सल्लाही दिला. 


"मी हे फार काळापासून बोलत आहे. पैसे कमवा, कोण मनाई करत आहे? पैसे नक्कीच कमवावेत. पण तुम्ही स्थानिक क्रिकेट अजिबात खेळत नाही, देशाला महत्वच देत नाही असं व्हायला नको," असं प्रवीणने म्हटलं आहे.


पुढे त्याने सांगितलं की, "आता काही खेळाडूंची ठराविक मानसिकताच झाली आहे. मी एक महिना आधी आराम करेन, नंतर आयपीएल खेळेन. मी इतके पैसे कसे काय सोडू असा विचार मनात येत असतो. हे मानसिक आहे. पण हे अजिबात योग्य नाही. खेळाडूने दोन्ही गोष्टींचा समतोल राखायला हवा. पैसा महत्त्वाचा आहे, पण आयपीएलला जास्त महत्व देणं चुकीचं आहे".


दरम्यान श्रेयस अय्यर रणजी सामन्यात चांगली कामगिरी करु शकला नाही. त्याने 8 चेंडूत फक्त 3 धावा केल्या आणि क्लीन बोल्ड झाला. मुंबई आणि तामिळनाडूमधील सामन्यादरम्यान संदीप वॉरिअरने त्याची विकेट घेतली. बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळल्यानंतर हा त्याचा पहिलाच रणजी सामना होता. 


मुंबईने गाठली फायनल


मुंबईने तामिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव करून 48 व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शार्दुल ठाकूरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबईने फायनलचं तिकीट मिळवलं आहे. शार्दूलने 104 चेंडूंत 13 चौकार आणि 4 षटकारासह 109 धावांची दमदार खेळी केली. तर गोलंदाजी करत असताना त्याने 4 महत्त्वाच्या विकेट्स काढल्या.