दिग्गज क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर (Ramakant Vitthal Achrekar) यांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी भारतीय क्रिकेट विनोद कांबळीनेही (Vinod Kambli) हजेरी लावली. विनोद कांबळीला यावेळी साधं उभं राहणं, व्यवस्थित बोलणंही जमत नव्हतं. त्याची अवस्था पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. एकेकाळी भारतीय क्रिकेटचं भवितव्य म्हणून पाहिलं जाणाऱ्या विनोद कांबळीची आता दयनीय अवस्था झाली आहे. या कार्यक्रमात विनोद कांबळीचा जिवलग मित्र सचिन तेंडुलकरही हजर होता. तसंच विनोद कांबळीचा माजी सहकारी समीर दिघेही उपस्थित होते. समीर दिघे यांनी मुंबईत संघातून खेळताना विनोद कांबळीसह अनेक सामने खेळले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत, समीर दिघे इतक्या वर्षांनी विनोद कांबळीला भेटल्यानंतर भावूक झाले होते. "मी अनेक वर्षांनी त्याला भेटलो. तो उठला आणि मला मिठी मारुन सम्या अशी हाक मारली. मला त्याची ही अवस्था पाहावत नव्हती. मला फार वाईट वाटलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. आम्ही मुंबईसाठी 14 वर्षं एकत्र खेळलो. त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी मी देवाला प्रार्थना करतो," असं समीर दिघे यांनी सांगितलं.


सचिन तेंडुलकर आणि विनोद काबंळी दोघांचंही वय सारखंच आहे. मात्र मंचावर उपस्थित असताना दोघांमधील फरक स्पष्टपणे जाणवत होता. शिवाजी पार्क जिमखानाने शेअर केलेल्या व्हिडीओत, सचिन विनोद कांबळीकडे जाऊन त्याची विचारपूस करताना दिसत आहे. रमाकांत आचरेकर यांचे शिष्य असणारे सचिन आणि विनोद कांबळी एकमेकाशी संवाद साधताना दिसले. पण यावेळी विनोद कांबळीला त्याचा पायावर उभं राहणंही कठीण जात होतं. सचिनचा हात पकडताना त्याचा हात थरथरत होता. सचिनचा हात पकडल्यानंतर विनोद कांबळी तो सोडण्यास तयार नव्हता. यावेळी एका व्यक्तीने मध्यस्थी करत सचिनला त्याच्या खुर्चीवर जाण्यास सांगितलं. 


कार्यक्रमांत रमाकांत आचरेकर यांच्या कन्या विशाखा दळवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपले वडील "निःस्वार्थ प्रशिक्षक" होते आणि मुलांना मार्गदर्शन करणे हे त्यांच्यासाठी शिक्षक असण्याचे सार कसे होते याबद्दल सांगितले. "सर नेहमी वृत्तपत्रांच्या मथळ्यांमध्ये 'निःस्वार्थ प्रशिक्षक' म्हणून ओळखले जायचे. त्यांच्याकडे कधीही व्यावसायिक दृष्टिकोन नव्हता. त्यांच्यासाठी शिक्षक असण्याचे मूलतत्त्व म्हणजे मुलांना मार्गदर्शन करणे, आणि ते त्यांनी मनापासून केले. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. आपल्यापेक्षा इतरांना नेहमी महत्त्व दिलं. त्यांच्यासारखे लोक दुर्मिळ असल्याने आम्ही त्यांना संत म्हणतो. 


"त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, आणि पद्मश्री यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले. इतकं यश मिळवूनही ते साधेपणाने जगले, ज्यांना प्रेम कसं करावं आणि जीवन पूर्णपणे कसं जगावं हे माहित होते. दौऱ्यावरुन आल्यानंतरही मी त्यांना कधीही थकलेलं पाहिले नाही. ते जेवल्यानंतर थेट मैदानावर परत जायचे. इतर सर्व तर सगळ्यांना माहिती आहे," असंही त्यांनी सांगितलं.