IPL 2019: सट्टा लावताना भारतीय टीमच्या माजी प्रशिक्षकाला अटक
आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या भारतीय टीमच्या माजी प्रशिक्षकाला अटक झाली आहे.
बडोदा : आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या भारतीय टीमच्या माजी प्रशिक्षकाला अटक झाली आहे. भारतीय महिला टीमचे माजी प्रशिक्षक तुषार अरोठे यांना पोलिसांनी अटक केली आहे. बडोदा क्राईम ब्रांचने याप्रकरणी १९ जणांना आरोपी बनवलं आहे. क्राईम ब्रांचला मिळालेल्या सुचनेनुसार दिल्ली आणि पंजाबच्या मॅचवेळी शहरातल्या अलकापुरी परिसरातील कॅफेमध्ये काही जण सट्टा लावत होते. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली तेव्हा तिकडे सट्टेबाज प्रोजेक्टरवर मॅच बघत होते आणि ग्राहकांचा सट्टा लावत होते. हे सट्टेबाज फोनमध्ये क्रिकेट फास्ट लाईव्ह लाईन, क्रिकेट लाईन गुरू, क्रिक लाईन या ऍपचा सट्टा लावण्यासाठी वापर करत होते.
या ऍपच्या माध्यमातून मॅचच्या एक बॉल आधी काय होणार आहे हे सट्टेबाजांना कळायचं. यामुळे हे सट्टेबाज मॅचवर सट्टा लावून मोठी रक्कम जिंकायचे. क्राईम ब्रान्चने घटनास्थळावरून भारतीय महिला टीमचे माजी प्रशिक्षक तुषार अरोठेसह १९ जणांना अटक केली आहे. यामधले १७ आरोपी कॉलेजचे विद्यार्थी आहेत.
तुषार अरोठे यांच्यासह कॅफेचे मालक निश्चल शाह आणि हेमांग पटेल यांना अटक करण्यात आली. याचबरोबर कॅफेमधून मोबाईल फोन, रोख रुपये, दुचाकी आणि चारचाकी वाहनं, प्रोजेक्टर याच्यासह १४.३९ लाख रुपयांचं सामान जप्त करण्यात आलं.
क्राईम ब्रांचचे डीसीपी जयदीप जडेजा म्हणाले, 'कायदेशीर कारवाईनंतर सगळ्या आरोपींना जामीन देण्यात आला. सट्टेबाजीमध्ये काही माजी क्रिकेटपटूंचाही समावेश असू शकतो. पोलीस याची चौकशी करत आहेत.'