`आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांकडून पक्षपातीपणा`
आयपीएलमधल्या ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.
मुंबई : आयपीएलमधल्या ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. काही टीमचे आयपीएल प्रशिक्षक हे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना टीममध्ये संधी देऊन पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ, वेस्ट इंडिजचा खेळाडू डॅरेन सॅमी आणि न्यूझीलंडचा माजी खेळाडू सायमन डूल यांनी हे आरोप केले आहेत. ब्रॅड हॉज हा पंजाबचा, रिकी पॉटिंग हा दिल्लीचा प्रशिक्षक आहे तर शेन वॉर्न राजस्थानच्या टीमचा मेंटर आहे. या तिघांवरही पक्षपातीपणा करत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना प्रमाणापेक्षा जास्त संधी दिल्याचा आरोप होत आहे.
ग्लेन मॅक्सवेल फॉर्ममध्ये नसतानाही दिल्लीच्या टीमनं त्याला प्रमाणापेक्षा जास्त मॅच खेळवल्या. रिकी पॉटिंग या टीमचा प्रशिक्षक आहे. ऍरोन फिंच आणि मार्कस स्टॉयनिसला खराब कामगिरी केल्यानंतरही पंजाबच्या टीममध्ये वारंवार संधी देण्यात आली आहे. बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये मुजीब खान दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्याऐवजी मार्कस स्टॉयनिसची निवड करण्यात आली. पण डेव्हिड मिलरला मात्र पंजाबनं संधी दिली नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजहा पंजाबचा प्रशिक्षक आहे.
राजस्थानच्या टीमचा मेंटर असणाऱ्या शेन वॉर्नवरही असेच आरोप होत आहेत. ऑस्ट्रेलियाचा डार्सी शॉर्ट फॉर्ममध्ये नसतानाही त्याला राजस्थानच्या टीमनं संधी दिली. पण राजस्थानच्या टीममध्ये दक्षिण आफ्रिकेचा हेनरीच क्लासिन असतानाही त्याला संधी देण्यात आली नाही.