मुंबई : टीम इंडियाची १२ क्रमांकाची जर्सी निवृत्त करावी, अशी मागणी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने केली आहे. युवराज सिंगसाठी बीसीसीआयने हा निर्णय घ्यावा, असं गंभीर म्हणाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या स्तंभात गंभीर म्हणाला, 'सप्टेंबर महिना माझ्यासाठी खास आहे. याच महिन्यात २००७ साली आम्ही टी-२० वर्ल्ड कप जिंकला. युवराज सिंगने उत्कृष्ट कामगिरी केली होती. २०११ सालच्या वर्ल्ड कप विजयाचा हिरोही युवराज होता. त्यामुळे त्याची १२ क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्यात यावी. हाच त्याच्यासाठी योग्य सन्मान असेल.'


युवराज सिंगने २००७ टी-२० वर्ल्ड कपच्या ५ इनिंगमध्ये १९५ पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने १४८ रन केले होते. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये युवराजने १२ बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. याच मॅचमध्ये त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या ६ बॉलमध्ये ६ सिक्स मारले होते. यानंतर २४ सप्टेंबरच्या फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचा ऐतिहासिक विजय झाला होता. पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा मान भारताला मिळाला होता.


२०११ सालच्या वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने दमदार कामगिरी केली होती. या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेला ६ विकेटने पराभूत केलं होतं. २८ वर्षानंतर भारताने पुन्हा वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कपच्या ९ इनिंगमध्ये युवराजने ३६२ रन केले आणि १५ विकेटही घेतल्या होत्या. या कामगिरीबद्दल युवराजला मॅन ऑफ द टुर्नामेंट देऊन गौरवण्यात आलं होतं. 


सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो घालत असलेली १० नंबरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. काही वर्षांपूर्वी शार्दुल ठाकूरने १० क्रमांकाची जर्सी घातल्यानंतर त्याला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर बीसीसीआयने यापुढे १० क्रमांकाची जर्सी कोणालाच देणार नाही, असं स्पष्ट केलं होतं.