दादाच्या सल्ल्यानंतर बुमराहची रणजी ट्रॉफीमधून माघार
जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सीरिजमधून जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.
सुरत : जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सीरिजमधून जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. या सीरिजआधी बुमराह रणजी ट्रॉफीमध्ये आपला फिटनेस सिद्ध करेल, असं बोललं जात होतं. पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने बुमराहला रणजी ट्रॉफी मॅच खेळण्यापासून रोखल्याचं वृत्त आहे.
ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यात बुमराहला दुखापत झाली होती, यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नव्हता. रणजी ट्रॉफीमध्ये बुमराह एलीट ग्रुप एमध्ये गुजरात आणि केरळविरुद्धच्या मॅचमध्ये खेळणार होता. बुधवारपासून सुरतच्या लालाभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियममध्ये ही मॅच सुरू होणार होती.
बुमराहने रणजी ट्रॉफी मॅचपासून लांब राहावं आणि मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करावं, असं गांगुलीने बुमराहला सांगितलं. बीसीसीआयच्या सूत्रांनीही गांगुलीने बुमराहला हा सल्ला दिल्याचं मान्य केलं आहे. ५ जानेवारीपासून भारत आणि श्रीलंकेमधल्या टी-२० सीरिजला सुरुवात होणार आहे.
बुमराह श्रीलंकेनंतर लगेचच होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमधून पुनरागमन करेल, असं बोललं जात होतं. पण निवड समितीने बुमराहला श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजसाठी निवडलं.
विशाखापट्टणमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या मॅचआधी बुमराहने भारतीय टीमसोबत सराव केला होता. स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्यामुळे बुमराह इंग्लंडला उपचारांसाठी गेला होता.