नवी दिल्ली : आयपीएलमधल्या खराब कामगिरीमुळे दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरनं त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. तसंच आयपीएलमध्ये त्याला मिळणारं मानधनही गंभीरनं नाकारलं आहे. गौतम गंभीरच्या या निर्णयाचं सगळे जण कौतुक करत असतानाच भारताच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी गंभीरवर टीका केली आहे. गौतम गंभीरच्या स्वभावामध्ये समस्या आहे. या स्वभावामुळेच गंभीर भारतीय टीमच्या बाहेर झाला होता आणि त्यानं माझ्यासोबतची मैत्री तोडली होती, असंही संदीप पाटील म्हणाले होते. द क्विंटसोबत बोलताना पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.


२००४मध्ये झाली गंभीरशी भेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम गंभीर आणि माझी भेट २००४ साली झाली. त्यावेळी गंभीर भारत-अ टीमचा हिस्सा होता. त्यावेळी मी भारतीय निवड समितीचा अध्यक्ष होतो. गंभीर तेव्हा भारतातल्या सर्वोत्तम युवा खेळाडूंपैकी एक होता. म्हणूनच त्याला टीममध्ये स्थान देण्यात आलं, असं पाटील म्हणाले. पुढची ७-८ वर्ष गंभीरसाठी चांगली होती आणि याच काळात तो टीममधला प्रमुख सदस्य होता. या काळात माझी आणि गंभीरची चांगली मैत्री होती. पण अचानक गंभीर टीमच्या बाहेर झाला. यामध्ये त्याच्या स्वभावाचा वाटा आहे. प्रत्येक खेळाडूमध्ये स्वभावाची समस्या असते पण खेळाडू त्याचा स्वभाव दुसऱ्या खेळाडूला दाखवायला लागला तर याचा नकारात्मक प्रभाव पडतो, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.


तो निर्णय गंभीरला भारी पडला


२०११ सालच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये गंभीरच्या डोक्याला बॉल लागल्यामुळे तो जखमी झाला होता. यानंतर गंभीरनं भारतात परतण्याचा निर्णय घेतला. गंभीरचा हाच निर्णय त्याला भारी पडला. टीमचे फिजिओथेरपिस्ट आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गंभीरची दुखापत ही सामान्य होती आणि तो खेळू शकला असता. पण गंभीरनं माघार घेतल्यामुळे त्याची जागा घ्यायला अनेक खेळाडू तयार होते. या कारणामुळे गंभीरचं टीममध्ये पुनरागमन झालं नाही, असं पाटील यांना वाटतं. एक वेळ अशी होती जेव्हा गंभीर सेहवाग, द्रविड, सचिन आणि गांगुलीसारखा भारताचा पुढचा सुपरस्टार व्हायच्या रेसमध्ये होता पण नंतर त्याला त्याचं टीममधलं स्थान वाचवणंही कठीण झालं, असं संदीप पाटील म्हणाले.