Shah Rukh Khan Connection With India Head Coach: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर सध्या चांगलाच चर्चेत आहे. भारतीय संघाचा भावी प्रशिक्षक म्हणून गंभीरचं नाव चर्चेत आहे. विशेष म्हणजे भावी प्रशिक्षकांच्या संभाव्य यादीमध्ये गंभीरचं आघाडीवर असून राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी गंभीरच्याच खांद्यावर असेल असं सांगितलं जात आहे. राहुल द्रविडचा कार्यकाळ पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपनंतर संपुष्टात येत आहे. त्यामुळेच सध्या इंडियन प्रिमिअर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर असलेल्या गौतम गंभीरसहीत अन्य काही ज्येष्ठ क्रिकेटपटूंकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रशिक्षक होण्यासंदर्भात विचारणार केल्याची माहिती आहे. मात्र आता भारताचा क्रिकेट प्रशिक्षक नेमताना इतर कोणाच्या होकारापेक्षा बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा होकार अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. 


गंभीर ऑफर आल्यास हो म्हणणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गंभीरला अधिकृतपणे प्रशिक्षक होण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही, असं 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र असा अधिकृत प्रस्ताव आल्यास भारताचा माजी सलामीवीर आनंदाने ही जबाबदारी स्वीकारण्यात तयार असल्याचं समजतं. "तो (गंभीर) अशी आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारणाऱ्यांपैकी आहे," असं टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. सध्या तो केकेआरच्या संघाचा मेंटॉर म्हणून काम पाहत आहे. गंभीरनेच कोलकात्याला दोनदा आयपीएलचं जेतेपद मिळवून दिलं आहे. आता त्याच्याच प्रशिक्षणाखाली कोलकात्याचा संघ फायलनलला पोहोचला असून 26 मे रोजी सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध खेळणार आहे. 


शाहरुखचा काय संबंध?


मात्र सध्या गौतम गंभीरकडे बीसीसीआयने मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला तर कोकाता नाईट रायडर्सचा संघ यासाठी परवानगी देईल का असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे गंभीरला नव्या जबाबदारीसाठी मुक्त करण्यामध्ये शाहरुख खानची महत्त्वाची भूमिका असणार आहे. गंभीरने प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारली तरी त्यासाठी त्याला शाहरुख खानची परवानगी घ्यावी लागणार आहे. कारण शाहरुख खान हा कोलकात्याच्या संघाचा मालक आहे.  "शाहरुख खान आणि गौतम गंभीरने खासगीत यासंदर्भात चर्चा होईल. त्यामध्येच काय तो निर्णय घेतला जाईल," असं सांगितलं जात आहे. म्हणजेच भारताचा पुढला प्रशिक्षक गौतम गंभीर असेल तर त्यासाठी शाहरुख खानची परवानगी घ्यावी लागणार आहे.


गंभीर कर्णधार असताना दमदार कामगिरी


गंभीरनेच केकेआरला 2011 आणि 2017 मध्ये जेतेपद मिळवून दिलं होतं. गंभीर कर्णधार असतानाच कोलकात्याचा संघ 2014 साली चॅम्पियन्स लिग टी-20 स्पर्धा खेळला होता.  42 वर्षीय गंभीर हा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारताच्या दोन संघांमध्ये होता. गंभीरने 2007 साली भारताने जिंकलेला टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलबरोबरच 2011 मध्ये जिंकलेल्या एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्ड कप फायनलच्या सामन्यात महत्त्वाचं योगदान दिलं होतं.