Gautam Gambhir Indirect Dig At Virat Kohli: भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये भारताने विद्यमान जग्गजेत्या संघावर 100 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेलं 229 धावांचा माफक आव्हान इंग्लंडच्या संघाला पेलवलं नाही आणि त्यांना या स्पर्धेतील पाचव्या पराभवाचं तोंड पहावं लागलं. दुसरीकडे भारताने विजयची डबल हॅटट्रीक केली. भारताच्या या विजयाचं श्रेय कर्णधार रोहित शर्माला जातं. प्रथम फलंदाजीमध्ये आणि नंतर गोलंदाजीमध्ये योग्य बदल करत नेतृत्वगुणांच्या माध्यमातून संघाला विजय सुखकर करुन देणाऱ्या रोहितला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. यंदाच्या पर्वात दुसऱ्यांदा रोहितला हा पुरस्कार देण्यात आला. रोहित शर्माचं शतक अवघ्या 13 धावांनी हुकलं. मात्र रोहितच्या नेतृत्व गुणांवर फिदा झालेला भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने शतकाच्या मुद्द्यावरुन रोहितचं कौतुक करतानाच अप्रत्यक्षपणे विराट कोहलीला लक्ष्य केलं आहे. 


229 धावांपैकी 87 धावा रोहितच्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने 87 धावांची खेळी केली. भारतीय संघाला 50 ओव्हरमध्ये 229 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यापैकी 87 धावा एकट्या रोहितच्या होत्या. म्हणजेच भारताने जेवढ्या धावा केल्या त्यापैकी 38 टक्के धावा एकट्या रोहितच्या बॅटमधून आल्या. भारताने इंग्लंडला वर्ल्ड कपच्या इतिहासातील त्याच्या सर्वात कमी धावसंख्येवर म्हणजेच 129 धावांवर तंबूत पाठवत सामना 100 धावांनी जिंकला. या विजयानंतर रोहितच्या नेतृत्व गुणांचं कौतुक गंभीरने केलं.


जाहिरातबाजी कामाची नाही


"नेतृत्व करणारा खरा लिडर हा टीमकडून त्याला जे हवं असतं तशीच कामगिरी आधी स्वत: करतो. तुम्हाला तुमच्या संघ सकारात्मक पद्धतीचा दृष्टीकोन ठेऊन फलंदाजी करावा असं वाटत असेल तर तुम्हीच ते तुमच्या कृतीमधून दाखवून दिलं पाहिजे. लीडिंग फ्रॉम द फ्रण्ट म्हणतात त्याप्रमाणे तुम्हीच नेतृत्व केलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचं पब्लिक रिलेशन (जाहिरातबाजी) किंवा मार्केटींग एजन्सी तुमच्यासाठी हे करु शकत नाही," असं गौतम गंभीरने 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना म्हटलं आहे. "रोहितने हेच केलं. त्याने त्याच्या कृतीमधून संघाला प्रेरणा दिली," असं गंभीरने म्हटलं.


वर्ल्ड कपसाठी खेळत आहात की शतकासाठी?


"धावांचा विचार केल्यास तो (रोहित शर्मा) अव्वल 10 फलंदाजांमध्ये किंवा अव्वल 5 फलंदाजांमध्येही नसेल. मात्र त्याचा फारसा फरक पडत नाही. तुमचं लक्ष्य 19 नोव्हेंबर रोजी ट्रॉफी जिंकण्याचं असायला हवं. तुमचं ध्येय हे शतक झळकावण्याचं आहे की वर्ल्ड कप जिंकण्याचं हे निश्चित केलं पाहिजे. तुमचं ध्येय शतक झळकावण्याचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने खेळावं. मात्र तुमचं ध्येय वर्ल्ड कप जिंकण्याचं असेल तर तुम्ही स्वत: एक निस्वार्थी कर्णधार असायला हवं. अगदी त्याच पद्धतीने जसा सध्या रोहित शर्मा फलंदाजी करतोय. त्याने हे वारंवार करत रहावं असं माझं मत आहे," अशी प्रतिक्रिया गंभीरने नोंदवली. यापैकी शतकाचा संदर्भ देत गंभीरने अप्रत्यक्षपणे कोहलीला टोला लगावला की काय अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे.


कोहलीचा संदर्भ काय?


पुण्यामध्ये झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये विराट कोहलीने अगदी उत्तम पद्धतीने सामन्यचा शेवट करताना संघाचा विजय आणि आपलं शतक असा दुग्धशर्करा योग जुळवून आणला होता. त्यानंतर झालेल्या न्यूझीलंविरुद्धच्या सामन्यातही विराटने अशाच पद्धतीने शतक आणि विजय एकाच चेंडूत साकारला जावा असा प्रयत्न करण्याच्या नादात झेल देऊन 95 धावांवर बाद झाला होता. यानंतर विराटवर शतकासाठी खेळत असल्याची टीका झाली होती.