गौतम गंभीर यांनी घरकाम करणाऱ्या महिलेवर केले अंत्यसंस्कार
`त्या माझ्या कुटुंबाचा एक भाग होत्या.`
मुंबई : संपूर्ण देश कोरोना व्हायरसविरोधात लढत असताना भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर यांनी माणुसकीचं उत्तम उदाहरण संपूर्ण जगासमोर ठेवलं आहे. गंभीर यांनी त्यांच्या घरात घरकाम करण्याऱ्या मोलकरणीवर अंत्यसंस्कार केले आहे. देशात लॉकडाऊन असल्यामुळे मोलकरणीचं मृतदेह त्यांच्या राहत्याघरी ओडिशाला पोहोचवणं शक्य नव्हतं. त्यामुळे गंभीर यांनी घरकाम करण्याऱ्या महिलेवर स्वत:अंत्यसंस्कार केले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. गेल्या ६ वर्षांपासून ही महिला गंभीर यांच्या घरी घरकाम करत होती.
ट्विटरवर घरकाम करणाऱ्या महिलेचा फोटो शेअर करत त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, 'त्या माझ्या कुटुंबाचा एक भाग होत्या. त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार करणं माझं कर्तव्य होतं. जात धर्म, वर्ग अशा कोणत्याच गोष्टींवर विश्वास न ठेवता एक चांगला समाज निर्माण करणं हिच माझी आपल्या भारतासाठी कल्पना आहे. ओम शांती..' असा संदेश त्यांनी समस्त नागरिकांना दिला आहे.
गौतम गंभीर यांच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेचे नाव सरस्वती पात्रा असं होतं. त्या ४९ वर्षाच्या होत्या. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांचा त्रास अधिक वाढल्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु २१ एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.