नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वर्ल्ड कपच्या टीममध्ये संधी न मिळाल्यामुळे अंबाती रायुडने निवृत्तीची घोषणा केली. वर्ल्ड कपदरम्यान ऑलराऊंडर विजय शंकरला दुखापत झाल्यामुळे मयंक अग्रवालला इंग्लंडला बोलावण्यात आलं. मयंक अग्रवालची निवड आश्चर्यकारक मानली गेली. कारण आरक्षित खेळाडूंमध्ये अंबाती रायुडूचं नाव असतानाही मयंक अग्रवालला संधी मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वात १५ सदस्यीय टीमची निवड करण्यात आली होती. त्यावेळी राखीव खेळाडूंचीही घोषणा करण्यात आली होती. वर्ल्ड कपमध्ये याआधी शिखर धवनला दुखापत झाली. तेव्हा ऋषभ पंतला संधी देण्यात आली. राखीव खेळाडूंमध्ये असूनही दोन्ही वेळा संधी न मिळाल्यामुळे रायुडू नाराज झाल्याचं बोललं जात आहे.


अंबाती रायुडूच्या या निवृत्तीला निवड समिती जबाबदार असल्याचा आरोप माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने केले आहेत. 'सध्याच्या निवड समितीची क्रिकेट कारकिर्द अपूर्ण होती. अशी कारकिर्द असणाऱ्यांनीही अंबाती रायुडूसारख्या चांगल्या खेळाडूला न्याय दिला नाही, याचं मला आश्चर्य वाटतंय. ही गोष्ट लज्जास्पद आहे. ट्रॉफी जिंकणं महत्त्वाचं आहेच, पण मन असणं जास्त महत्त्वाचं आहे,' असं ट्विट गंभीरने केलं आहे.



रायुडूने टीम इंडियासाठी एकूण ५५ सामने खेळले आहेत. यात त्याने १६९४ रन केल्या असून यात १० अर्धशतकांचा समावेश आहे. रायुडूने वनडेमध्ये २४ जुलै २०१३ ला झिम्बाब्वेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. रायुडूने आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध यावर्षी ८ मार्चला खेळला होता.