मुंबई : भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. विराट कोहली हा चतूर कर्णधार नाही, त्यामुळे त्याची तुलना धोनी किंवा रोहित शर्माशी होऊ शकत नाही. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आणि रोहितच्या नेतृत्वात मुंबईने आत्तापर्यंत तीन-तीन वेळा आयपीएल जिंकलं आहे. तर विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूला एकदाही आयपीएल जिंकता आलं नाही. तर गौतम गंभीरने त्याच्या नेतृत्वात कोलकाताला २०१२ आणि २०१४ साली आयपीएलमध्ये विजय मिळवून दिला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मागच्या ८ वर्षांमध्ये आयपीएलमध्ये विजय मिळवूनही कोहली बंगळुरूचा कर्णधार म्हणून कायम आहे, हे त्याचं भाग्य आहे. कोहलीने बंगळुरू टीम प्रशासनला धन्यवाद दिले पाहिजेत, कारण तो अजूनही बंगळुरूच्या टीमसोबत आहे. स्पर्धा न जिंकणाऱ्या कर्णधारांना एवढा वेळ दिला जात नाही', असं गंभीर म्हणाला. 'विराट कोहलीला मी चतूर कर्णधार म्हणून बघत नाही. तो रणनिती आखणारा कर्णधारही नाही. त्याने एकदाही आयपीएल जिंकलं नाही. जेवढं खेळाडूचं रेकॉर्ड चांगलं तेवढाच तो खेळाडू चांगला असतो,' असं वक्तव्य गंभीरने केलं.


'आयपीएलमध्ये धोनी आणि रोहितने तीनवेळा ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे विराटला अजून मोठं अंतर कापायचं आहे. याबाबतीत तुम्ही विराटची तुलना रोहित किंवा धोनीशी करु शकत नाही,' अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली.


कोलकात्याकडून सात वर्ष खेळल्यानंतर गंभीर २०१८ साली या टीमपासून वेगळा झाला. यानंतर मागच्या मोसमात गंभीरला दिल्लीच्या टीमचं नेतृत्व देण्यात आलं. पण खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे गौतम गंभीरनं सुरुवातीच्या काही मॅचनंतर माघार घेतली. यानंतर श्रेयस अय्यरकडे दिल्लीचं नेतृत्व देण्यात आलं.


गौतम गंभीरची ही टिप्पणी कोहलीच्या आयपीएलमधल्या नेतृत्वाबद्दल आहे. कारण विराटच्याच नेतृत्वात भारताने नुकतीच ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवला.