नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर नेहमीच त्याच्या सामाजिक उपक्रमांमुळे चर्चेत असतो. गरजवंतांना मदत करण्यासाठी गौतम गंभीर नेहमीच धाऊन जातो. शहीद जवानांच्या मुलांसाठी गौतम गंभीरनं आत्तापर्यंत अनेकवेळा मदत केली आहे. गंभीर लष्कर आणि शहिदांच्या समर्थनार्थ फक्त बोलतच नाही तर त्यांची मदतही करतो. गरजू मुलांच्या शिक्षणासाठी गंभीरनं एका संस्थेची स्थापना केली आहे. गौतम गंभीर फाऊंडेशन असं या संस्थेचं नाव आहे. २०१४ साली गंभीरनं या संस्थेची स्थापना केली आहे. शहिद जवानांच्या कुटुंबाला मदत मिळावी म्हणून ही संस्था काम करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम गंभीरच्या संस्थेनं नुकतच अभिरुन दास या मुलाची जबाबदारी घेतली आहे. अभिरुन हा आसामच्या कामरूप जिल्ह्यात राहणारा ५ वर्षांचा मुलगा आहे. अभिरुनचे वडील दिवाकर दास आसामच्या पलाशबाडीमध्ये सीआरपीएफचे जवान होते. मागच्या वर्षी ते शहीद झाले. यानंतर गंभीरची संस्था अभिरुनपर्यंत पोहोचली आणि त्याची जबाबदारी स्वीकारली.


मागच्या वर्षी छत्तीसगडच्या सुकमामध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर गंभीरनं शहिद जवानांच्या २५ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या एएसआय अब्दुल राशिदची मुलगी जोहराला गंभीरनं दत्तक घेतलं. या मुलीच्या शिक्षणाचा खर्च गंभीरनं उचलला. जोहरा मी लोरी म्हणून तुला झोपवू शकत नाही, पण तुझी स्वप्न साकार करायला नक्की मदत करेन. तुझ्या शिक्षणाचा खर्च मी करेन, असं भावनिक ट्विट गंभीरनं केलं होतं.