हॉकी संघाचं स्वप्नभंग! रोमांचक सामन्यात जर्मनीकडून 3-2 ने पराभव, कांस्य पदकाच्या आशा कायम
India vs Germany Hockey : भारतीय हॉकी संघाने सेमीफायनल सामन्यात जर्मनीकडून पराभव स्विकारला. जर्मनी संघाने 3-2 ने विजय मिळवत फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. तर भारताकडे कांस्य पदक पटकाव्याची संधी आहे.
India vs Germany Hockey: जर्मनी हॉकी संघाने भारतीय हॉकी संघाचा 3-2 ने पराभव करून फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. रोमांचक सामन्यात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली मात्र, जर्मनीने शिस्तबद्ध खेळ करत तीन महत्त्वाचे गोल नोंदवले. भारतीय संघाकडून कॅप्टन हरमनप्रीत सिंग आणि सुखजित सिंग यांनी प्रत्येकी एक एक गोल नोंदवला. आता भारतीय संघाला संपुष्टात आलं नसून भारतीय संघाकडे कांस्य पदक जिंकण्याची संधी असणार आहे. भारतीय संघ आता कांस्य पदकासाठी स्पेनसोबत (india vs spain) दोन हात करणार आहे. स्टार खेळाडू अमित रोहिदास याला रेड कार्ड मिळाल्याने त्याचा फटका भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये बसला.
सामन्यात नेमकं काय काय झालं?
भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये सात पेनल्टी कॉर्नर मिळालं. त्यापैकी एकाचे गोलमध्ये रूपांतर झाले. भारतासाठी हरमनप्रीत सिंगने सातव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचा वापर करत गोल केला. त्यानंतर जर्मनीने जोरदार कमबॅक केलं. दुसऱ्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरवर गोल करत जर्मनीने भारताविरुद्धचा स्कोअर 1-1 असा केला. जर्मनीसाठी गोन्झालो पिलाटने 18व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. सामना आता बरोबरीत आला होता.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये क्रिस्टोफर रुहेरने जर्मनीसाठी 27 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर अप्रतिम गोल करत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. भारतासाठी सुखजित सिंगने ३६व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला. सामन्यात दोन्ही संघाने पेनल्टी कॉर्नर मिळत असताना दोन्ही संघाने जोरदार डिफेन्स केला. चौथ्या क्वार्टरमध्ये आघाडी घेत जर्मनीने सामन्यात पुनरागमन केलं. 54 व्या मिनिटाला मार्को मिल्टकाऊने गोल करत 3-2 ने आघाडी मिळवली आणि सामना जर्मनीच्या बाजूने झुकवला. अखेर भारताला तिसरा गोल करता आला नाही आणि जर्मनीने फायनलचं तिकीट निश्चित केलं.
हॉकी संघाचा ऑलिम्पिकमधील इतिहास
भारताने ऑलिम्पिकमधील अखेरचे सुवर्णपदक 1980 साली मॉस्कोत जिंकले होते. यावेळी भारताकडे 44 वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवण्याची संधी होती. भारताने 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये शेवटचं रौप्यपदक जिंकलं होतं. मागील टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने कांस्य पदक जिंकलं होतं. 1968, 1972 आणि 2020 या तीन ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले आहेत. आता भारताकडे कांस्य पदक जिंकण्याची आणखी एक संधी आहे.